नवी दिल्ली : सिक्किममधील सीमावाद आणि हिंदी महासागरात तैनात असलेली चीनची पाणबुडी यामुळे भारत आणि चीनमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांच्या बाजूने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कटाक्षाने चाचपणी केली जात आहे. चिनी लष्कराच्या हालचालींवर भारताकडून ‘रुक्मिणी’ नजर ठेवत आहे.


भारतीय नौदलाचं मिलिटरी सॅटेलाईट ‘जीसॅट-7’ उपग्रह चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. ‘जीसॅट-7’ला नौदलाने रुक्मिणी असं नाव दिले आहे. या उपग्रहाचं 29 सप्टेंबर 2013 रोजी प्रक्षेपण झालं होतं.

‘रुक्मिणी’ भारताचं पहिलं लष्करी उपग्रह आहे. 2 हजार 625 किलो वजनाचं हे सॅटेलाईट हिंदी महासागराच्या 2 हजार किलोमीटर परिसरावर नजर ठेवून असतं. हे मल्टिबँड कम्युनिकेशन-कम-सर्व्हिलान्स सॅटेलाईट असून, समुद्राच्या पृष्ठभागापासून 36 हजार किमी उंचीवर हे उपग्रह कार्यरत आहे.

समुद्रातील सर्व हालचाली ‘रुक्मिणी’ नौदलाकडे पोहोचवतं. हिंदी महासागरातील वाढत्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने खास ‘रुक्मिणी’ला तयार करण्यात आले आहे.

नुकतंच ‘रुक्मिणी’च्या माध्यमातूनच नौदलाला कळलं की, किमान 14 चिनी नौदलाच्या जहाजांनी भारतीय सागरी क्षेत्रात घुसखोरी केली आहे.