नेटिझन्सने #BoycottSnapchat ही मोहीम सुरु केली, त्यामुळे अनेकांनी स्नॅपचॅट हे अॅप अनइन्स्टॉल केलं. मात्र अनेकांनी चुकीने स्नॅपचॅट समजून स्नॅपडीलच मोबाईलमधून डिलीट केलं. त्यामुळे या वादाचा स्नॅपडीललाही विनाकारण फटका बसला.
भारतीय नेटिझन्सनी स्नॅपचॅटच्या सीईओंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. त्यानंतर इव्हान स्पिगेल यांना आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही द्यावं लागलं. मात्र तरीही भारतीय नेटिझन्सनी स्नॅपचॅट विरोधातील मोहीम सुरुच ठेवली आणि अॅप डिलीट करुन या अॅपचं प्ले स्टोअर्सवरील मानांकनही कमी केलं.
अॅप स्टोअरनं दिलेल्या माहितीनुसार, स्नॅपचॅटच्या ग्राहक रेटिंगमध्ये घसरण झाली आहे. रविवारी सकाळी स्नॅपचॅटला दीड रेटिंग (9527 रेटिंग) मिळलं आहे. पण इतरांच्या अॅपच्या स्पर्धेतही स्नॅपचॅटनं चांगलीच मान टाकली आहे. सध्या स्नॅपचॅटला एक किंवा दीड (6099 रेटिंग) रेटिंग मिळत आहे.
स्नॅपचॅट सीईओंच्या वक्तव्यानंतर, गुगल प्ले स्टोअरवरील रेटिंग घसरलं आहे. स्नॅपचॅटचे माजी कर्मचारी अँथनी पॉम्पलियानो यांनी स्नॅपचॅटच्या सीईओंचं हे वक्तव्य उघडकीस आणलं. त्यांनी 2015 मध्ये आपल्याला भारतासारख्या गरिब देशांसाठी आपलं अॅप नसल्याचं पॉम्पलियानो यांना सांगितलं होतं.
दरम्यान, ट्विटरवरुनही स्नॅपचॅटविरोधात भारतीय नेटिझननी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर स्नॅपचॅटला नेटिझननी ट्रोल करुन चांगलाच फटका दिला आहे. भारतीयांनी ट्विटरवर #boycottsnapchat ही मोहिम सुरु केली आहे. स्नॅपचॅटविरोधातील भारतीयांची ही मोहिम ट्विटरवर सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.