मुंबई : भारत हा गरिबांचा देश असल्याचं स्नॅपचॅटच्या सीईओचं वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडत आहे. कारण स्नॅपचॅटचे सीईओ इव्हान स्पिगेल यांच्या या वक्तव्यानंतर स्नॅपचॅटच्या रेटिंगमध्ये घट होण्यास सुरुवात झाली आहे. स्नॅपचॅट वापरणाऱ्या भारतीयांनी आपल्या मोबाईलमधून स्नॅपचॅटचं अॅप अनइन्स्टॉल करण्यास सुरुवात केली आहे.


अॅप स्टोअरनं दिलेल्या माहितीनुसार, स्नॅपचॅटच्या ग्राहक रेटिंगमध्ये घसरण झाली आहे. रविवारी सकाळी स्नॅपचॅटला दीड रेटिंग (9527 रेटिंग) मिळलं आहे. पण इतरांच्या अॅपच्या स्पर्धेतही स्नॅपचॅटनं चांगलीच मान टाकली आहे. सध्या स्नॅपचॅटला एक किंवा दीड (6099 रेटिंग) रेटिंग मिळत आहे.

स्नॅपचॅट सीईओंच्या वक्तव्यानंतर, गुगल प्ले स्टोअरवरील रेटिंग घसरलं आहे. स्नॅपचॅटचे माजी कर्मचारी अँथनी पॉम्पलियानो यांनी स्नॅपचॅटच्या सीईओंचं हे वक्तव्य उघडकीस आणलं. त्यांनी 2015 मध्ये आपल्याला भारतासारख्या गरिब देशांसाठी आपलं अॅप नसल्याचं पॉम्पलियानो यांना सांगितलं होतं.

पॉम्पलियानो यांनी सीईओंचं रविवारी वक्तव्य उघड केल्यानंतर भारतीयांनीही स्नॅपचॅटचा चांगलाच समाचार घेतला आहे. भारतीयांनी सोशल मीडियावरुन स्नॅपचॅटच्या सीईओंच्या वक्तव्याचा निषेध करुन, आपल्या मोबाईलवरुन हे अॅप अनइन्स्टॉल करत असल्याचं म्हणलं आहे.

यामुळे स्नॅपचॅटचं रेटिंग कमालीचं घसरत आहे. अॅप स्टोअरवर पूर्वी स्नॅपचॅटला पाच स्टारचं रेटिंग मिळत होतं. पण आता त्यात घसरण होऊन एकवर पोहोचलं आहे. तर अॅन्ड्रॉईड प्ले स्टोअरसवरही स्नॅपचॅटच्या रेटिंगमध्ये घसरण झाल्याचं चित्र आहे.

दरम्यान, ट्विटरवरुनही स्नॅपचॅटविरोधात भारतीय नेटिझननी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर स्नॅपचॅटला नेटिझननी ट्रोल करुन चांगलाच फटका दिला आहे. भारतीयांनी ट्विटरवर #boycottsnapchat ही मोहिम सुरु केली आहे. स्नॅपचॅटविरोधातील भारतीयांची ही मोहिम ट्विटरवर सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

संबंधित बातम्या

स्नॅपचॅटचा सीईओ म्हणतो, आमचं अॅप श्रीमंतांसाठी, भारत गरीब देश!