मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारती एअरटेल या दोन भारतीय टेलिकॉम कंपन्या आपापल्या नेटवर्कना 5G मध्ये बदलणार आहेत. बीएसएनएल आणि एअरटेलला यासाठी नोकिया ही मोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी मदत करणार आहे. त्यासंदर्भात एअरटेल आणि बीएसएनएलने नोकियासोबत सामंजस्य करारही केला आहे.

भारतात 5G नेटवर्क आणणं, हेच या सामंजस्य कराराचं ध्येय आहे. या कामासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, ते पाहू. 5G नेटवर्कच्या दिशेने ही सुरुवात आहे, असे नोकियाचे भारतातील मार्केटिंग हेड संजय मलिक यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात 2019-2020 दरम्यान व्यावसायिक हेतूसाठी 5G नेटवर्कचं लॉन्चिंग केलं जाऊ शकतं. यासाठी भारतात फिल्ड-कंटेट आणि अॅप्लिकेशन या गोष्टींची चाचणी 2018 पासूनच केली जाईल.

नोकिया आधीपासूनच एअरटेलला 9 सर्कलसाठी 4G इक्विपमेंट पुरवते. त्यामध्ये गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश पूर्व, मुंबई, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिसा, पंजाब आणि केरळ या 9 सर्कलचा समावेश आहे. त्यामुळे नोकियाचं एअरटेलसोबत काम करणं, यात नवीन नसेल.

5G नेटवर्क काय असेल, त्याचं काम कसं चालेल, कोणत्या गोष्टी त्यासाठी आवश्यक आहेत इत्यादी माहितीसाठी नोकिया बंगळुरुमधील आपल्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटरमध्ये एक्स्पीरियन्स सेंटर सुरु केलं जाणार आहे.

नोकियाच्या अमित मारवाह यांच्या म्हणण्यानुसार, जगात 2G नेटवर्क विकसित होण्यासाठी जवळपास 10 वर्षे लागली. त्यानंतर 3G आणि 4G नेटवर्कसाठी त्याहून कमी वेळ लागला. तंत्रज्ञानामध्ये भारत इतर देशांच्या तुलनेत तोडीस तोड आहे.

एककीडे नोकियाच्या मदतीने बीएसएनएल आणि भारती एअरटेल 5G नेटवर्कसाठी तयारी करत असताना, दुसरीकडे सॅमसंग आणि रिलायन्स जिओ 5G नेटवर्कसाठी पार्टनरशिप करणार असल्याचे यंदाच मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमधून समोर  आले. त्यामुळे 5G नेटवर्कसाठी आगामी काळात भारतात मोठी स्पर्धा सुरु होईल, यात शंका नाही.

दरम्यान, 5G नेटवर्कसाठी नोकिया, एअरटेल आणि बीएसएनएल या आपापल्या ठिकाणी जायंट मानल्या जाणाऱ्या कंपन्या एकत्र येणार असल्याने भारतातील टेलिकॉम क्षेत्राचं या संपूर्ण घडामोडीकडे लक्ष लागून राहिले आहे.