नवी दिल्ली : अल्टो कारने सलग 13 वर्षे सर्वाधिक विक्री झालेली कार म्हणून विक्रम नोंदवला आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात एकूण 2 लाख 41 हजार अल्टो कारची विक्री झाली. मारुती-सुझुकी कंपनीने अल्टोच्या विक्रमी विक्रीचा दावा केला आहे.   


मारुती-सुझुकीच्या विपणन आणि विक्री विभागाचे कार्यकारी संचालक आर. एस. कलसी यांनी सांगितले, “अल्टो कार सलग 13 वर्षे विक्रीमध्ये अव्वल राहिली आहे. एखाद्या कारच्या लोकप्रियतेचं यापेक्षा मोठं प्रमाण काय असू शकतं?”

अल्टो कार सप्टेंबर 2000 मध्ये बाजारात लॉन्च करण्यात आली होती. एक दशकाहून अधिक काळ या कारचा बाजारात दबदबा राहिला आहे. टू पेडल टेक्नोलॉजीमध्ये अल्टो कारची किंमत सर्वात कमी आहे.

मारुती-सुझुकी कंपनीने 2016-17 या आर्थिक वर्षात एकूण 14 लाख 43 हजारांहून अधिक गाड्यांची विक्री केली. यामध्ये 17 टक्के विक्री अल्टो कारची आहे. त्याचसोबत श्रीलंका, चिली, फिलिपाईन्स आणि उरुग्वे यांसारख्या देशांमध्येही 21 हजार अल्टो कारची निर्यात करण्यात आली.

अल्टोचं लॉन्चिंग 2000 साली झालं, त्यानंतर वेळोवेळी कारमध्ये बदल करण्यात आले. सध्याच्या मॉडेलमध्ये 800 सीसी आणि के 10 इंजिन असे दोन प्रकार उपलब्ध असून, सीएनजी व्हेरिएंटची सुविधाही देण्यात आली आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार, ऑल्टो कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल केले असून, अल्टो कारच्या प्रकारामधील गाड्यांमधील ही एकमेव अशी कार आहे, जिच्यात ड्रायव्हरला एअरबॅगची सुविधा आहे. सध्या रेनॉल्ट क्विड आणि ह्युंदाई इयॉन या दोन कारशी ऑल्टोची स्पर्धा आहे.

सुमारे अडीच लाख ते 3 लाख 77 हजार रुपयांदरम्यान अल्टो 800 कारची किंमत आहे. ऑल्टो के 10 कारची किंमत 3 लाख 30 हजार ते 4 लाख 16 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.