नवी दिल्ली : डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या लकी ड्रॉ योजनेचं एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे. रुपे डेबिट कार्ड वापरुन 1590 रुपयांचा डिजिटल व्यवहार करणाऱ्या सेंट्रल बँक इंडियाच्या एका ग्राहकाला सरकारच्या एक कोटींचं बंपर इनाम मिळालं आहे.


राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात या बंपर बक्षीसांची सोडत काढण्यात आली. या योजनेतील विजेत्यांमध्ये तीन ग्राहक आणि तीन दुकानदारांचा समावेश आहे.

नोटाबंदीनंतर सरकारने देशात डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना सुरु केल्या होत्या.

यामध्ये ग्राहक श्रेणीमधील पहिलं एक कोटींचं बक्षीस सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा ग्राहकाला, दुसरं 50 लाखांचं इनाम बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकाला आणि तिसरं 25 लाखाचं बक्षीस पंजाब नॅशनल बँकेच्या एका ग्राहकाला मिळालं आहे. या तिघांनी डेबिट कार्डने व्यवहार केला होता.

दरम्यान, विजेत्यांच्या नावाची घोषणा अद्याप केलेली नाही. पण त्यांनी केलेल्या व्यवहाराची माहिती दिली आहे. त्यांच्या कार्डच्या नंबरद्वारे त्यांची ओळख पटवली जाईल.

अशाचप्रकारे तीन दुकानदारांनाही 50 लाख, 25 लाख आणि 12 लाख रुपयांचं इनाम मिळालं आहे.

येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नागपुरात होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विजेत्यांना बक्षीसाचं वितरण केलं जाईल.