सोलापूर: एक शिक्षक हजारो विद्यार्थी घडवतो असं म्हटलं जातं. पण कल्पकतेनं विद्यार्थी घडवणारा शिक्षक असेल तर देशाचं चित्र नक्कीच वेगळं दिसेल. असाच एक कल्पक शिक्षक टेक्नोलॉजीच्या आधारावर आज सोलापूरमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनां पैलू पाडत आहे.

सरकारी शाळेतील शिक्षण आणि तेथील शिक्षकांविषयी नेहमीच अनेक चर्चा सुरु असतात. मात्र, सोलापूरमधील माढा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजीतसिंह डिसले यांच्या शाळेतील एका महत्वाच्या उपक्रमची थेट मायक्रोसॉफ्टनं दखल घेतली असून त्यांना आता कॅनडातील टोरोन्टो येथील आयोजित करण्यात आलेल्या जागितक परिषदेसाठी निमंत्रण देण्यात आलं. रणजीतसिंह हे सोलापूरमधील बार्शीचे रहिवासी आहेत.



शिक्षक रणजीतसिंह डिसले यांच्या 'QR कोडेड पाठ्यपुस्तक' या उपक्रमाची जगातील ३०० अभिनव प्रोजेक्टमध्ये निवड करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टच्या वतीने ही निवड करण्यात आली असून या उपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने त्यांना विशेष आमंत्रण दिले आहे. येत्या २१ ते २३ मार्च या कालावधीत टोरोन्टो येथे आयोजित जागतिक परिषदेत हा तंत्रस्नेही प्रयोग सादर केला जाणार आहे.

याविषयी एबीपी माझाशी बोलताना रणजीतसिंह डिसले म्हणाले की, 'सध्या मुलांना मोबाइलचं बरंच आकर्षण आहे. त्यामुळे याच गोष्टीचा वापर करुन मी हा उपक्रम सुरु केला. टेक्नोलॉजीचा फायदा शिक्षणासाठी करुन घेता येतो आणि आता या उपक्रमामुळे मुलं अधिक जास्त व्यक्त होऊ लागले आहेत.'

            शिक्षक रणजितसिंह डिसले

कॅनडातील परिषदेसाठी मायक्रोसॉफ्टकडून एकमेव जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची निवड:

हा उपक्रम तयार केल्यानंतर मागच्या वर्षी रणजितसिंह यांनी तो मायक्रोसॉफ्टला पाठवला. त्यानंतर जगभरातील 5000 अभिनव उपक्रम मायक्रोसॉफ्टनं गोळा केले. यावेळी मायक्रोसॉफ्टनं भारतातील शिक्षणाशी निगडीत उपक्रम दिल्लीत पाहिले. त्यानंतर त्यांनी देशभरातून आठ शिक्षकांची कॅनडातील परिषदेसाठी निवड केली. त्यामध्ये रणजीतसिंह डिसले यांचीही निवड करण्यात आली. इतर आठ शिक्षक हे खासगी शाळेत कार्यरत आहेत. तर रणजितसिंह हे एकमेव जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक आहेत.

शिक्षक रणजितसिंह यांनी अशी वापरली कल्पकता:

रणजितसिंह हे सोलापूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गांना शिकवतात. यावेळी रणजितसिंह यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करुन मुलांना शिक्षणाची गोडी लावली. त्यांनी मराठी, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र आणि विज्ञान या पुस्तकातील धडे, कविता मुलांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन दिले. सुरुवातील त्यांनी कवितांचे ऑडिओ रेकॉर्ड केले, त्यानंतर धड्यासाठी त्यांनी स्वत: व्हिडिओ तयार केले. यासाठी पेज तयार करुन प्रत्येक कविता आणि धड्याला कोडिंग दिलं. त्याचे कोड पुस्तकातही छापण्यात आले. हा कोड स्कॅन केल्यानंतर मुलांना डिजिटल स्वरुपात हे व्हिडिओ वर्गात पाहता येतात. तसेच विद्यार्थी घरी देखील सहजपणे अभ्यास करु शकतात.

                                                   मायक्रोसॉफ्टकडून शिक्षक रणजितसिंह डिसले यांना कॅनडातील परिषदेसाठी आलेलं पत्र

‘QR कोडेड बुक्स’ प्रोजेक्ट नेमका आहे तरा कसा?

पुस्तकाच्या प्रत्येक पानावर हे QR कोड चिटकवले असून या कोडमध्ये त्या-त्या पानाशी संबंधित आशय डिजिटल स्वरुपात साठवला आहे.

मोबाईलद्वारे हा कोड स्कॅन केला कि कविता ऑडिओ स्वरुपात ऐकता येते. तर धडा चक्क व्हिडिओ स्वरुपात पाहता येतो. तसेच प्रश्नपत्रिका ऑनलाईन सोडवता येतात. असा हा प्रोजेक्ट ते राबवत आहेत.


राज्य शासनाने देखील त्यांच्या या प्रकल्पाची दखल घेत इयत्ता ६वीची सर्वच पुस्तके QR कोड फॉर्ममध्ये छापली आहेत. सध्या राज्यातील १८००००० मुले अशी पुस्तके वापरत आहेत.

या अभिनव प्रयोगाची दखल मायक्रोसॉफ्टनं घेतल्यान रणजितसिंह यांच्या मेहनतीचं खऱ्या अर्थानं चीज झालं आहे. दरम्यान, कॅनडातील टोरोन्टो येथे होणाऱ्या परिषदेत रणजितसिंह यांच्या प्रयोगाला स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे 300 जणांसह रणजितसिंह यांच्या प्रयोगाचं देखील सादरीकरण होणार आहे. त्यानंतर शिक्षणाशी संबंधित प्रकल्पांवर या 300 जणांमध्ये चर्चा होणार आहे. त्यातून इतर नव्या प्रयोगांसाठी मायक्रोसॉफ्ट चालना देणार आहे.



‘व्हर्च्युअल फिल ट्रिप्स’ शिक्षक रणजितसिंह यांचा आगामी उपक्रम:

‘QR कोडेड बुक्स’नंतर रणजितसिंह हे विद्यार्थ्यांसाठी ‘व्हर्च्युअल फिल ट्रिप्स’ हा नवा प्रयोग लाँच करणार आहेत. यासाठी त्यांना जिल्हा परिषदेकडूनही मदत मिळणार आहे.

व्हर्च्युअल फिल ट्रिप्स म्हणजे नेमकं काय?

एखादा धडा किंवा कविता शिकवताना त्यातील असणारी ठिकाणं लाईव्ह दाखवण्याचा यातून प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी तेथील स्थानिक शिक्षकांचीही मदत घेण्यात येणार आहे.

उदा: समजा, इतिहासातील एका धड्यात जर रायगडाचा उल्लेख असेल तर त्यावेळी रायगडच्या जवळील शिक्षक तेव्हा रायगडावर जाऊन तिथून लाईव्ह देईल आणि वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना थेट रायगडाची माहिती मिळेल.