पुणे: अनोखळी व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक अजिबात उघडणं किंवा कुणाला ती लिंक पाठवणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. कारण असं केल्यास तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केलं जाऊ शकतं. अशीच पुण्यातील एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
पुण्यातील एका तरुणीच्या नावाने ‘पेटीएम’ अकाउंटवर पैसे मागून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीला व्हॉट्सअॅपवर अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये असलेली लिंक परत त्याच क्रमांकावर पाठविण्यात यावी. असे त्या मेसेजमध्ये म्हटलं होते.
तरुणीने देखील लिंक परत त्या क्रमांकावर पाठविली. त्यानंतर हॅकरने तिचं व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केलं. त्यानंतर तिची कॉन्टॅक्ट लिस्ट त्यानं चोरली. त्या लिस्टमधील तीन व्यक्तीशी त्यानं व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधला. त्यानंतर आपण तिच तरुणी असल्याचं हॅकरनं त्यांना भासवलं. त्या तिनही व्यक्तींकडे पैशाची गरज असल्याचे सांगत हॅकरनं पेटीएमच्या अकाउंटवर पैशाची मागणी केली.
दोन व्यक्तींनी प्रत्येकी पाच व एकाने चार हजार रुपये सांगितलेल्या पेटीएम अकाउंटवर पाठविले. मात्र, त्यानंतर तरुणीशी संपर्क साधला असता तिने अशा प्रकारचे पैसे मागितले नसल्याचे सांगितलं. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तरुणीने सायबर सेलकडे तक्रार केली आहे.
अशा पद्धतीनं तुम्हाला मेसेज आल्यास त्याची खात्री तुमच्या मित्र-मैत्रिणींकडून करून घ्या आणि त्यानंतरच पैसे पाठवा. असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
व्हॉट्सअॅपवर हॅकर्सची नजर, मुंबईत महिलेचं व्हॉट्सअॅप हॅक