मुंबई: दादरमधील सेल्फी पाँईट वादावर अखेर मुंबई महापालिकेनेच तोडगा काढला आहे. मनसे, भाजप आणि शिवसेना या तीनही राजकीय पक्षांना शिवाजी पार्कातच सेल्फी पॉईंटसाठी जागा देण्याचा निर्णय, मुंबई महापालिकेने घेतला आहे.


प्रत्येकी 50 फुटांच्या अंतरावर तीनही पक्षांचे सेल्फी पॉईंट असतील.

काय आहे वाद?

शिवाजी पार्काजवळ मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट सुरु केला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाल्याने, त्यांनी देखभालीचा खर्च शक्य नसल्याचं सांगत सेल्फी पॉईन्ट बंद केला होता.

मनसेने हा सेल्फी पॉईंट बंद करण्याची घोषणा केल्यानंतर, भाजपने हा सेल्फी पाईंट आपण सुरु ठेवणार असल्याची घोषणा केली. हा सेल्फी पॉईंट आणखी आकर्षक करणार असल्याचं मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवर सांगितलं होतं. विशेष म्हणजे भाजपला यासाठी महापालिकेकडून परवानगीही मिळाली होती. 

यानंतर मग शिवसेनेनंही सेल्फी पॉईन्टची जबाबदारी स्वीकारत मोठमोठे होर्डिंग्स शिवाजी पार्कात लावले. यापुढे नवीन कलाकृतीसह आपण सेल्फी पॉईंट सुशोभित करत असल्याचं सेना नगरसेविका विशाखा राऊत यांनी फलकाच्या माध्यमातून सांगितलं.

मग मनसेने पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या आदेशानुसार आम्ही हा सेल्फी पॉईंट सुरु ठेवणार असल्याचं म्हणत, सेल्फी पॉईंट सुरुच राहील अशी भूमिका घेतली होती.

त्यामुळे तीनही पक्षांनी सेल्फी पॉईंटसाठी पसंती दाखवल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र आता मुंबई महापालिकेने तीनही पक्षांना परवानगी दिली आहे. 

संबंधित बातम्या

सेल्फी पॉईंटवरुन 'सेल्फी'श राजकारण, सेना-मनसे-भाजपची रस्सीखेच


मुंबईत मनसेनं बंद केलेला सेल्फी पॉईंट भाजप सुरु करणार!


मुंबईमधील शिवाजी पार्कातील ‘सेल्फी पॉईंट’ बंद