मुंबई: जगातील बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचं निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. 70 च्या दशकात बिल गेट्स यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टचा पाया घातला होता. कॅन्सरने त्रस्त असलेल्या पॉल यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. पॉल यांनी दोन आठवड्यापूर्वीच आपल्याला कॅन्सरने घेरल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं होतं. 9 वर्षांपूर्वीही त्यांच्यावर उपचार झाले होते. मात्र कॅन्सरने पुन्हा उभारी घेतल्याने पॉल यांची प्रकृती बिघडली होती.
दरम्यान, पॉल अॅलन यांच्या निधनामुळे मायक्रोसॉफ्टने आपला शोकसंदेश जारी केला. “पॉल यांनी आमची कंपनी, इंडस्ट्री आणि समाजासाठी दिलेलं योगदान अतुलनीय आहे” असं मायक्रोसॉफ्टने म्हटलं आहे. मायक्रोसॉफ्टचे सध्याचे सीईओ सत्या नडेला यांनीही शोक व्यक्त करताना, पॉल यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक म्हणून केलेलं काम मोठं आहे. त्यांनी नवनवे प्रोडक्ट आणले, त्यांच्या अनुभवाने संस्था मोठी झाली, त्याचवेळी त्यांनी जगालाही बदललं, असं म्हटलं.
पॉल अॅलन यांची संपत्ती
तरुण वयापासूनच मोठं संशोधन करणारे पॉल अॅलन यांच्या संपत्तीचा पसारा मोठा आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, पॉल यांची संपत्ती 20.3 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 149 अब्ज रुपये इतकी आहे.
मायक्रोसॉफ्टची स्थापना
पॉल अॅलन आणि बिल गेट्स हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र. या बालमित्रांची आवडही सारखीच होती. दोघांनाही कॉम्प्युटर, तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरबाबत आकर्षण होतं. त्यातूनच दोघांनी मिळून 1975 मध्ये मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना केली. त्यावेळी पॉल हे 22 वर्षांचे तर बिल गेट्स अवघ्या 19 वर्षांचे होते. मायक्रोसॉफ्टसाठी 1980 हे वर्ष लाखमोलाचं ठरलं. कारण आयबीएम कॉर्पने पर्सनल कॉम्प्युटर (पीसी) क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आयबीएमने मायक्रोसॉफ्टला पीसीसाठी ऑपरेटिंग सिस्टिम पुरवण्यास सांगितलं.
या निर्णयामुळे मायक्रोसॉफ्ट हे तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगभरात अव्वल ठरलं. मायक्रोसॉफ्टचे दोन्ही संस्थापक हे अल्पावधीत अरबपती झाले. मात्र पैसा मिळवणं हे काही एकमेव ध्येय दोघांचंही नव्हतं. या दोघांनी नंतर मोठं समाजकार्य केलं. पॉल अॅलन यांनी बेघर, अनाथांना मदत केली. शिवाय त्यांनी गेल्या काही दशकांपासून संशोधन क्षेत्रासाठी 2 अब्ज डॉलरपेक्षा जास्त पैशाचा पुरवठा केला आहे. पॉल अॅलन यांनी 1983 मध्ये मायक्रोसॉफ्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.