मुंबई : 'मारुती सुझुकी' कंपनीने आपल्या नव्या 'अर्टिगा' कारच्या लॉन्चिंगची तयारी केलीय. भारतातील रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून अर्टिगाच्या अपडेटेड एमपीव्ही मॉडेलची चाचणी सुरु असून, अपडेटेड कार 21 नोव्हेंबर रोजी लॉन्च केली जाणार आहे, अशी माहिती ऑटोकार इंडियाने आपल्या वृत्तात दिलीय.


नव्या मारुती सुझुकी अर्टिगामध्ये प्रीमियम डिझाईन असेल. शिवाय, जुन्या मॉडेलच्या तुलनेत आकाराने नव्या मॉडेलमधील कार मोठी असेल.

समोरील बाजूस फ्रेश ग्रिल, DRLs सोबत एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, फॉग लॅम्प आणि स्पोर्टी बंपर अशा आकर्षक गोष्टींसह फ्लोटिंग रुफ डिझाईनही नव्या अर्टिगाच्या आकर्षणाचं केंद्र असणार आहे. हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित मारुती सुझुकीची नवी अर्टिगा कार असेल.

नव्या अर्टिगामध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्लेसोबतच 6.8 इंचाचा टचस्क्रीन सिस्टम देण्यात आले असून, SHVS माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीसह 1.5 लीटर पेट्रोल इंजिने देण्यात आलंय. या इंजिनची क्षमता 103bhp आणि पिक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता 138Nm आहे. या इंजिनला ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सला जोडण्यात आले आहे.

सुरक्षेची खबरदारीही या नव्या अर्टिगा कारमध्ये घेण्यात आली आहे. स्टँडर्ड ड्युअल एअरबॅग, एबीस, ईबीडी आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखे सुरक्षेच्या कारणास्तव फीचर्स या कारमध्ये समाविष्ट करण्यात आलेत.

एकंदरीत जुन्या अर्टिगामध्ये अनेक सुधारणा करुन आणि अनेक नव्या गोष्टी समाविष्ट करुन नव्या अर्टिगा मॉडेलला लॉन्च केले जाईल. मात्र या बहुप्रतीक्षित नव्या मॉडेलच्या लॉन्चिंगसाठी 21 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.