मुंबई: नोटबंदीचा निर्णय हा धाडसी असून भविष्यात याचा फायदा होईल. पण या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी वेळ दिला पाहिजे, असं मत जेष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष अनिल डॉ.काकोडकर यांनी व्यक्त केलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र' या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी ई शेतीपासून ते स्मार्ट सिटीपर्यंतच्या विविध विषयांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ''सध्याच्या काळात डिजिटल तंत्रज्ञान हे जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. डिजिटलायझेशनमुळे सामान्य व्यक्तींच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचा धांडोळा घेण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.''
यानंतर 'माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र' संबंधीची आपली मते मांडताना डॉ. काकोडकर म्हणाले की, ''डिजिटल क्रांतीमुळे आजच्या समाजजीवनात फार मोठा बदल झाला आहे. आजच्या ज्ञानाच्या युगात डिजिटल तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण सतराव्या शतकात सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या लाटेवर आरुढ होऊ शकलो नाही.'' अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, ''इतिहासाचा धांडोळा घेतला, तर औद्योगिक क्रांतींच्या पूर्वी भारत हा आर्थिक महासत्ता होता. पण नंतरच्या काळात भारताच्या अर्थकारणाची अधोगती झाली. आजच्या ज्ञानाच्या युग हे तरुणांचे युग असल्याने आपल्याकडे फार मोठ्या संधी आहेत. परदेशात वसलेल्या भारतीयांतून त्याचंच प्रतिबिंब दिसतं.''
केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया'च्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले की, ''आज आपण केमिकल आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात स्वावलंबी झालो आहोत. पण इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं मोठ्या प्रमाणात आयात करावी लागतात. त्यामुळे जसं सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताने प्रगती केली आहे, तशीच प्रगती हार्डवेअर क्षेत्रातही भारताने केली पाहिजे. त्यामुळे 'मेक इन इंडिया'पेक्षा 'मेड इन इंडिया'वर अधिक भर देण्याची गरज आहे. तेव्हाच आपण जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेला समर्थपणे तोंड देऊ शकू.''
नोटाबंदीच्या निर्णयाच्या अनुषंगानेच नोकरशाहीतील कार्यपद्धती बदलण्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. काकोडकर म्हणाले की, ''पॉलिटीकल लिडरशिपने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. पण जुन्या मंडळींना बदलायला वेळ लागतो, नवी मंडळी लवकर बदलतात. नोकरशाहीत जवळपास सर्व जुनी मंडळी आहेत. तेव्हा आगामी काळात बदल नक्की घडेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या चर्चासत्रात डिजिटल क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनीही आपापली मते मांडली.