लंडन: सेमीकंडक्टरच्या टंचाईमुळे ऑटोमोबाइल क्षेत्रातील उत्पादन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता आणखी एका गोष्टीचा फटका ऑटोमोबाइल क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टरच्या टंचाईनंतर आता ऑटो उद्योगासमोर मॅग्नेशियम टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. ऑटो कंपन्यांकडून काळजीचे कारण नसल्याचे सांगण्यात येत असले तरी येणाऱ्या काळात ऑटो क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो अशी भीती जाणकरांनी व्यक्त केली आहे. सेमीकंडक्टरच्या टंचाईच्या कारणासाठी कारणीभूत असणाऱ्या चीनमुळे मॅग्नेशियमची टंचाई जाणवणार आहे. 


कार निर्मितीत मॅग्नेशियम महत्त्वाचे का?
कार निर्मितीमध्ये सेमीकंडक्टर प्रमाणे मॅग्नेशियम हा देखील महत्त्वाचा घटक आहे. गाड्यांचं वजन कमी करण्यासाठी मॅग्नेशियम वापरलं जाते. त्यातही इलेक्ट्रिक कार्स निर्मितीमध्ये याचं महत्व अधिक आहे. जगातील ८५ टक्के मॅग्नेशियम चीनमधून येतं. चीनमधील मॅग्नेशियम उत्पादन आणि पुरवठ्यातील अडथळा आला तर जगातील ऑटो क्षेत्राला त्याचा फटका बसणार आहे. कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या थेटपणे मॅग्नेशियमची खरेदी करत नाहीत. मात्र, वाहनाचे सुट्टे भाग तयार करणारे मॅग्नेशियमचा वापर करतात. मॅग्नेशियमच्या वापराने कारचे वजन कमी केले जाते. 


या कारणांमुळे मॅग्नेशियम उत्पादन कमी
चीनमध्ये सध्या अभूतपूर्व वीज निर्मिती संकट निर्माण झाले आहे. विविध कारणांमुळे चीनला कोळशाची टंचाई जाणवत आहे. वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा चढ्या दराने खरेदी करावा लागत आहे. वीज भारनियमनामुळे चीनमध्ये नेहमीपेक्षा 50 टक्के कमी मॅग्नेशियमचे उत्पादन सुरू आहे.  त्याचा फटका वाहन निर्मितीला बसणार असल्याचे म्हटले जात आहे. 


चीनने काही मॅग्नेशियम उत्पादकांना उत्पादन पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु कमतरता कमी करण्यासाठी हे उत्पादन पुरेसे नसल्याचे म्हटले जाते. जानेवारीतील किंमतीपेक्षा सध्या असलेली मॅग्नेशियमची किंमत दुप्पट झाली आहे. 


युरोपच्या ऑटोमोबाईल उत्पादक असोसिएशनचे (एसीईए) आंतरराष्ट्रीय व्यापार संचालक जोनाथन ओ'रिओर्डन यांनी रॉयटर्सला सांगितले की, आम्ही या मुद्यावरून चिंतेत आहोत. येत्या काही आठवड्यांमध्ये त्याचे परिणाम दिसू लागतील. गीअरबॉक्सेस आणि स्टीयरिंग व्हीलसाठी मॅग्नेशियम वापरणार्‍या जर्मनीच्या ZF ने रॉयटर्सला सांगितले की, इतर देशांकडून मॅग्नेशियमचे नवीन स्त्रोत शोधत आहेत. चीनकडून मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशियमचा पुरवठा होतो. त्यामुळे चीनमुळे होणाऱ्या टंचाईची भरपाई होणे थोडं आव्हानात्मक ठरणार आहे.