मुंबई : रॉकेलने तुम्ही स्टोव्ह पेटवला असेल, रॉकेलने पाण्याचा बंबही पेटवला असेल, रॉकेलने कारखान्यातल्या भट्ट्याही पेटताना बघितल्या असतील, पण आता हेच रॉकेल...रॉकेट उडवणार आहे. खेळण्यातलं नव्हे तर खरंखुरं. तेही चक्क सहा टन वजनी. सध्याच्या वजनापेक्षा तब्बल दोन टन जास्त आणि हे शक्य होणार आहे शुद्ध रॉकेलचा वापर केल्याने.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आपल्या जीएसलव्ही एमके-3 या अवजड भारवाही रॉकेटची क्षमता वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. यावरच संशोधन करत असताना एक भन्नाट माहिती इस्रोच्या हाती लागली. इलॉन मस्कची स्पेस एक्स ही खाजगी अंतराळ उड्डाण कंपनी अवजड भारवाही रॉकेटसाठी रॉकेल म्हणजेच केरोसिनच्या अतिशुद्ध रुपाचा इंधन म्हणून वापर करते.
केरोसिन कसं उपयुक्त?
केरोलॉक्स म्हणून ओळखले जाणारे हे इंधन सध्याच्या प्रचलित हॉयड्रोलॉक्सपेक्षा खूपच जास्त प्रभावी ठरत आहे.
त्याची घनता दहापट जास्त तर सामान्य तापमानाला स्थिरता जास्त, धोका मात्र किमान असतो.
म्हणेजच हे इंधन सध्याच्या इंधनापेक्षा स्वस्त पडणार आहे.
सध्या घरातील स्वयंपाकासाठी गॅसचा जास्तीत जास्त वापर होऊ लागल्याने रॉकेलचा वापर कमी होऊ लागला आहे, पण आता तेच रॉकेल अंतराळात झेप घेण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. शुद्ध केलेलं रॉकेल वापरणं हायड्रोजनपेक्षा स्वस्त असेलच पण वजन वाहण्याची क्षमताही वाढवणारं ठरणार आहे. त्यामुळे आता परदेशात द्यावा लागणारा कोट्यवधीचा खर्चही वाचणार आहे.