न्यू यॉर्क : आता व्हॉट्सअॅपवरुन फेसबुक, इन्स्टाग्रामवर, फेसबुकवरुन व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर आणि इन्स्टाग्रामवरुन फेसबुक, व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवता येणार आहे. न्यूयॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गला ही नवी आयडीयाची कल्पना सुचली आहे. मार्कने फेसबुकच्या मालकीच्या तीनही सोशल मीडिया अॅप्सना एकमेकांशी जोडण्याचे ठरवले आहे.


ही नवी प्रणाली फेसबुक कधी वापरात आणणार याबाबत अद्याप तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही सुविधा सुरु करण्याचे फेसबुकने ठरवले आहे. परंतु त्याच्या चाचण्या पूर्ण होण्यास कदाचित अधिक वेळ लागेल, असेही फेसबुकने म्हटले आहे. त्यामुळे ही सुविधा सोशल मीडिया युजर्सना मिळण्यास थोडा उशीर होईल. त्यामुळे 2020 च्या जानेवारी फेब्रुवारीदरम्यान ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

सध्या फेसबुकचे युजर्स कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे फेसबुकवरील युजर्सची संख्या व युजर्सचा फेसबुकवरील वेळ वाढावा यासाठी मार्कने ही नवी शक्कल लढवली आहे. या नव्या सुविधेमुळे फेसबुकवर वेळ घालवणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढणार आहे. या सुविधेमुळे फेसबुक हे गुगलच्या मॅसेंजिंग अॅप्स आणि अ‍ॅपलच्या आय मॅसेजला टक्कर देऊ शकेल.

फेसबुकचे ऑर्कुट होऊ नये म्हणून...
गुगलने ऑर्कुट हे मेसेजिंग अॅप सुरु केल्यानंतर अल्पावधितच प्रसिद्ध झाले. परंतु त्यामध्ये काळानुसार बदल करण्यात गुगल अपयशी ठरले होते. त्यामुळे काळाच्या ओघात ऑर्कुट मागे पडले. गेल्या काही महिन्यांपासून फेसबुकचे युजर्स कमी झाले आहेत. तसेच फेसबुकवर असंख्य युजर्स असे आहेत ज्यांनी फेसबुकचा वापर खूप कमी केला आहे. त्यामुळे फेसबुकचीदेखील ऑर्कुटसारखी गत होईल, असे बोलले जात आहे. त्यामुळेच फेसबुकच्या सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने फेसबुकला नवसंजीवनी देण्यासाठी ही नवी शक्कल लढवली आहे.

तीनही अॅप्स सुरक्षित
नवी मॅसेजिंग प्रणाली सुरु झाल्यानंतर लोकांची प्रायव्हसी आणि सुरक्षितता धोक्यात येईल असे बोलले जात आहे. परंतु फेसबुकच्या टीमने त्याचे खंडण केले आहे. मॅसेज पाठिवण्याची नवी प्रक्रिया एंड टू एंड एनक्रिप्टेड म्हणजे सुरक्षित असणार आहे. ही प्रणाली आजही व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वापरली जाते. या प्रणालीमुळे व्हॉट्सअॅपवरील मॅसेज कोणीही हॅक करू शकत नाही.