Intel FakeCatcher : बनावट व्हिडीओमुळे ( Fake Video ) सध्या मोठा धोका निर्माण झाला आहे. व्हॉट्सॲप ( Whatsapp ), फेसबुक ( Facebook ) आणि ट्विटर ( Twitter ) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बनावट व्हिडीओ शेअर केले जातात. या बनावट व्हिडीओमुळे अनेकदा चुकीची माहिती पसरवली जाते. अशा चुकीच्या माहितीमुळे संबंधित व्यक्ती, संस्था किंवा इतरांचे आर्थिक नुकसानही होते. यामुळे इंटेल कंपनीने अशा बनावट व्हिडीओंवर उपाय शोधला आहे. इंटेलने एक तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे 96 टक्के अचूकतेसह बनावट व्हिडीओ शोधू शकतं. हे जगातील पहिले रिअल-टाइम डीपफेक डिटेक्टर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.


इंटेलचं नवीन FakeCatcher तंत्रज्ञान


रिअल-टाइममध्ये डीपफेक व्हिडीओ शोधणं अवघड आहे कारण त्यासाठी विश्लेषणासाठी व्हिडीओ अपलोड करणार्‍या डिटेक्शन अॅप्स आवश्यकता असते आणि याचा परिणाम जाणून घेण्यासाठी काही तास वेळ लागतो. पण इंटेलने, नवीन AI तंत्रज्ञान विकसित करत 'FakeCatcher' ची निर्मिती केली आहे. हे एक तंत्रज्ञान आहे 96 टक्के अचूकतेसह बनावट व्हिडीओ शोधू शकतं, असा कंपनीचा दावा आहे. हे डीपफेक डिटेक्शन प्लॅटफॉर्म हे जगातील पहिले रिअल-टाइम डीपफेक डिटेक्टर आहे, जे मिलिसेकंदांमध्ये फेक व्हिडीओ शोधून काढतं.


FakeCatcher अवघ्या काही सेकंदात शोधतं फेक व्हिडीओ


इंटेल लॅबमधील वरिष्ठ कर्मचारी संशोधन शास्त्रज्ञ इल्के डेमिर यांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होतात. डीपफेक व्हिडीओ म्हणजे एखादी व्यक्ती किंवा संस्थेसंबंधित फेक व्हिडीओ आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीने न केलेल्या कामाचा बनावट व्हिडीओ बनवला जातो. यासाठी फुटेजमधील चेहरा मॉर्फ करून बदलने, एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचा वापर करणे, अशा गोष्टी केल्या जातात. यामध्ये बहुतेक वेळा प्रसिद्ध व्यक्तींचे व्हिडीओ पाहायला मिळतात. या व्यक्तींनी प्रत्यक्षात कधीही केल्या नसलेल्या गोष्टींचे बनावट व्हिडीओ बनवले जातात. डीपफेक व्हिडीओंचा धोका वाढत असल्याने, कंपन्या भविष्यात सायबर सुरक्षा उपायांसाठी 188 अब्ज डॉलर खर्च करणार आहे.


हे तंत्रज्ञान कसं काम करतं?


बहुतेक डिटेक्टर बनावट व्हिडीओ आहे की नाही हे शोधण्यासाठी आणि व्हिडीओमध्ये काय चूक आहे हे ओळखण्यासाठी कच्चा डेटा पाहतात. याउलट, FakeCatcher हे तंत्रज्ञान व्हिडीओच्या पिक्सेलच्या साहाय्याने मानवी हालचालींचं निरीक्षण करते. जेव्हा हृदय शरीरात रक्त पंप करते, तेव्हा शिरांचा रंग बदलतो. रक्त प्रवाहांसंबंधित हे बदल काही सिग्नलच्या रुपाने चेहऱ्यावर दिसून येतात. अल्गोरिदम हे सिग्नल्स स्पॅटिओटेम्पोरल नकाशांमध्ये बदलून त्यानंतर, त्यांचं सखोल परिक्षण करून व्हिडीओ खरा आहे की खोटा हे इंटेल झटपट शोधून काढतं.