न्यूयॉर्क : जगभरातील नेटवर्क मोठ्या प्रमाणात ‘वानाक्राई’पासून सुरक्षिततेसाठी शर्थीचे प्रयत्न करत असतानाच, ‘चेक पॉईंट’ या फर्मने ‘फायरबॉल’ या नव्या व्हायरसच्या धोक्याचा इशारा दिला आहे.

‘फायरबॉल’चा आतापर्यंत जगातील 25 कोटी कॉम्प्युटरवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारताचाही समावेश आहे.

‘वायर्ड डॉट कॉम’ने शुक्रवारी एका वृत्तात म्हटलंय की, ब्राऊजर हॅक करण्यासाठीच ‘फायरबॉल’चं डिझाईन करण्यात आले आहे.

‘फायरबॉल’चा कॉम्प्युटरवर हल्ला झाल्यानंतर डिफॉल्ट सर्च इंजिन असलेल्या गूगलमध्ये बदल होतो आणि बीजिंगस्थित डिजिटल मार्केटिंग फर्म राफोटेककडून यूझर्सच्या वेब ट्राफिकचं नियंत्रण केलं जातं. एकदा या व्हायरसचा हल्ला झाला की, कोणतंही कॉम्प्युटर कुठूनही रन करता येतं आणि कम्प्युटरला हानिकारक असलेल्या फाईल्स डाऊनलोड केल्या जाऊ शकतात.

‘चेक पॉईंट’नुसार, जवळपास 25 कोटी कॉम्प्युटर अगदी सहजपणे ‘फायरबॉल’चे शिकार बनू शकतात. हे व्हायरस कॉम्प्युटर ऑपरेटिंगसाठी बॅकडोअर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात. ज्यामुळे चिनी हॅकर कॉम्प्युटरवर सहजपणे नियंत्रण मिळवू शकतात.

‘चेकपॉईंट’ने आपल्या ग्राहकांच्या नेटवर्कच्या विश्लेषणाच्या आधारे असा अंदाज वर्तवला आहे की, जगभरातील कॉर्पोरेट जगतातील प्रत्येक पाच कॉम्प्युटरमधील एक कॉम्प्युटर ‘फायरबॉल’ला बळी पडला आहे.