मुंबई : अनेकदा आपल्याला हृदय विकाराचा आजार आहे हे जोपर्यंत हृदय विकाराचा झटका येत नाही तोपर्यंत कळत नाही. मात्र मुंबई आयआयटीने यावर एक नाम उपाय शोधत नवीन यंत्र तयार केलं आहे.


आपल्याला हृदय विकाराच्या धोक्याची पातळी कळावी आणि त्यावर उपचार तातडीने घेता यावे यासाठी मुंबई आयआयटीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी यावर संशोधन करून एक नवीन यंत्र बनवलं आहे.

या यंत्राची किंमत जर तुम्ही विचारात असाल, तर अवघ्या दीड हजारात हे यंत्र तुम्हाला मिळू शकेल. या यंत्राच्या मदतीने आपण आपलं एक थेंब रक्त देऊन आपल्याला हृदय विकारासंदर्भातील धोक्याची पातळी कळू शकेल.

या यंत्राच्या मदतीने आपण आपल्या स्मार्टफोनवरही ही चाचणी करु शकतो.

बायोसायन्स आणि बायोइंजिनीअरिंगचे प्राध्यापक सौम्य मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली देबास्मिती मोंडल आणि सौरभ अग्रवाल या दोन विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केलं आहे.

यंत्र काम कसं करणार?

हे यंत्र हार्ट अटॅकला कारणीभूत ठरणाऱ्या मायोग्लोबिन आणि मायोलोपेरॉक्सीडाईज या दोन बायोमार्करचं प्रमाण मोजू शकणार आहे.

मायोग्लोबिनने रक्तामध्ये प्रवेश केल्यानंतर हृदयाला होणारा रक्तपुरवठा बंद होतो, ज्यामुळे कार्डियाक अरेस्टचा धोका असतो. त्यामुळे या यंत्राद्वारे याचा अंदाज घेणं शक्य होईल आणि त्याचप्रमाणे मायोलोपेरॉक्सीडाईजची माहितीही या यंत्राद्वारे मिळू शकेल.

यंत्र बनवण्यासाठी साडे पाच हजार रुपये खर्च आला आहे. मात्र व्यावसायिक वापरासाठी हे यंत्र केवळ 1500 रुपयांपेक्षाही कमी दरात उपलब्ध करुन दिलं जाईल, असं संशोधकांचं म्हणणं आहे.