नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी कॅशलेस इंडियाचा नारा दिल्यापासून डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर चांगलाच वाढला आहे. एका कार्डच्या माध्यमातून कोणत्याही अडचणींशिवाय अनेकजण लाखोंची खरेदी करतात. पण जेव्हा तुमचं हेच कार्ड चोरी झाल्यावर, तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कार्ड चोरी झाल्यावर सर्वात आधी काय करावं, हे अनेकांना लक्षात येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला कार्ड चोरी झाल्यानंतर सर्वात आधी काय केलं पाहिजे याबद्दल सांगणार आहोत.

कार्ड चोरी झाल्यास काय करावे?



  • तुमचं डेबिट अथवा क्रेडिट कार्ड हारवलं किंवा चोरी झालं, तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करुन कार्ड ब्लॉक करायला लावा. जेणेकरुन तुमच्या कार्डचा मिसयूज होणार नाही. शिवाय, कार्ड हारवल्याची तक्रार पोलीस स्थानकातही दाखल करा.

  • यानंतर बँकेत जाऊन कार्ड चोरी झाल्याची माहिती देऊन, नव्या एटीएमसाठी अर्ज करा. नवं एटीएम करताना तुमच्याकडे पोलीस एफआयआरची मागणी केली जाईल, त्यामुळे त्याची एक झेरॉक्स कॉपीही तुमच्या जवळ ठेवा.

  • तुम्हाला नव्या कार्डची पूर्तता दोन प्रकारात होऊ शकते. यात पहिलं म्हणजे, तुम्हाला तुमच्या पत्त्यावर ते पाठवलं जाऊ शकतं. किंवा तुम्ही स्वत: बँकेत जाऊन ते घेऊ शकता. यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र असणं गरजेचं आहे. तसेच यावेळी तुम्हाला त्याच बँकेचा कॅन्सल चेक द्यावा लागतो.

  • जर तुम्ही नव्या डेबिट कार्डसाठी ऑनलाईन किंवा बँकेत स्वत: जाऊन अर्ज केला असाल, तर बँक तुम्हाला नवा पिन नंबर देईल. काही बँका आपल्या खातेदारांना हातोहात पिन नंबर देतात. पण सर्वसाधारणपणे त्यांना आपल्या खातेदारांच्या पत्त्यावर पिन नंबर कुरिअर करावा लागतो. हा नवा पिन 27 ते 48 तासात अॅक्टिवेट होईल.

  • विशेष म्हणजे, तुमचं कार्ड चोरी झाल्यानंतर तुमच्या ऑनलाईन बँकिंगचा पासवर्ड तत्काळ बदला. कारण यामुळे तुमच्या खात्यावरील रोकड सुरक्षित राहण्यासाठी हे गरजेचं आहे.

  • तसेच, याच ऑप्शनचा वापर करुन तुम्ही तुमच्या अकाऊन्ट वरील पैसे तुमच्याच दुसऱ्या अकाऊन्टमध्ये ट्रान्सफर करु शकता. कार्ड हारवल्यानंतरचा हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.

  • इंटरनेट किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून बँकिंग व्यवहार करताना सेव्ह डिटेल्सचा पर्याय नेहमी अनचेक ठेवा. कारण, अनेकवेळा तुमचे कार्डचे डिटेल्स ऑनलाईन सेव्ह होतात. ज्यामुळे तुमच्या कार्डचा CVV वापरुन कोणीही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतं. तेव्हा सेव्ह ऑप्शन नेहमी अनचेकच ठेवा.

  • तसेच बँकिंग SMS अलर्टचा ऑप्शन नेहमी सुरु ठेवा. ज्यामुळे तुमच्या कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहाराची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळेल. जर तुमच्या खात्यातून कोणीतरी व्यवहार करत असल्याचं जाणवल्यास त्याची माहिती तत्काळ बँकेला द्या.

  • महत्त्वाचं म्हणजे, एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतर नेहमी कॅन्सल बटन दाबत चला. जेणेकरुन तुमचा एटीएमचा पासवर्ड सुरक्षित राहिल.


हे नेहमी लक्षात ठेवा!



  • आर्थिक व्यवहारासाठी कधीही कुणालाही तुमचं एटीएम कार्ड देऊ नका.

  • प्रत्येक 2 किंवा 3 महिन्यांनी तुमच्या एटीएम आणि क्रेडिट कार्डचा पिन नंबर बदलत जा.


एटीएम-क्रेडीट कार्ड प्रोटेक्शन प्लॅन


सध्या अनेक बँका तुमच्या कार्डच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी प्लॅन देऊ करतात. ज्यातून तुमच्या वॉलेटसाठी सुरक्षा कव्हर मिळतं. काही बँकांनी तर हे प्लॅन बँकेच्या विविध योजनांशीही जोडलं आहे. त्यामुळे बँक देत असलेल्या कार्ड सुरक्षेसंदर्भातील प्लॅनचाही तुम्ही वापर करु शकता.