नवी दिल्ली : दहा वर्षांपूर्वी श्रीमंतीचं स्टेटस मानली जाणारी अॅम्बेसेडर कार आता फ्रेंच कंपनीच्या मालकीची होणार आहे. अॅम्बेसेडर या ब्रँडची ‘प्युजो’ या फ्रेंच कंपनीला विक्री करण्याचा निर्णय हिंदुस्तान मोटर्स या कंपनीनं केला आहे.
80 कोटी रुपयांमध्ये हा करार करण्यात आला. प्युजो कंपनी यापुढे कार निर्मितीसाठी अॅम्बेसेडर या ब्रँडचा वापर करणार का हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या कराराच्या माध्यमातून मिळालेल्या 80 कोटी रुपयांमधून कर्मचारी आणि इतरांची देणी भागवली जाणार असल्याचं सी. के. बिर्ला ग्रुपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
एकेकाळी पंतप्रधान, राजकीय नेते, मोठे अधिकारी, अभिनेते या सगळ्यांनीच अॅम्बेसेडर गाडीला पसंती दिली होती.
90 च्या दशकाच्या मध्यावर जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था उदारीकरणाचे धोरण अवलंबत होती, त्यावेळी प्युजो कंपनी भारतात आली. त्यामुळे उदारीकरणातील सुरुवातीच्या परदेशी कंपन्यांमधील एक महत्त्वाची कंपनी म्हणून प्युजो कंपनीची ओळख आहे.