लंडन : सध्या ‘सेल्फीयुग’ सुरु आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सेल्फी काढणं आणि तो फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियवर शेअर करणं, नेहमीचंच झालंय. मात्र, एका संशोधनात सेल्फीबाबत काही रंजक गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या सोशल मीडियावर सेल्फी शेअर करणाऱ्यांना नक्कीच विचार करायला लावणाऱ्या आहेत.
कुणी संशोधन केलं?
जर्मनीतील लुडविंग मॅक्सीमिलियन यूनिव्हर्सिटी ऑफ म्युनिखमधील (LMU) संशोधकांनी सेल्फी काढणारे, सोशल मीडियावर सेल्फी पाहणारे यांचं सर्वेक्षण केलं आणि लोकांच्या प्रतिक्रिया, मतं जाणून घेतली. यासाठी या संशोधकांनी ऑनलाईन सर्वेक्षण केलं. ऑस्ट्रिया, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमधील जवळपास 238 जणांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. हे संशोधन ‘फ्रंटियर्स इन सायकॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
संशोधनात काय म्हटलंय?
एलएमयूच्या संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणातून काही रंजक गोष्टी समोर आल्या. या संशोधनानुसार, सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 77 टक्के जण नियमित सेल्फी काढतात आणि दुसऱ्याच्या सेल्फीपेक्षा स्वत: काढलेला सेल्फी त्यांना चांगला असल्याचा मानतात.
62 ते 67 टक्के लोकांचं सेल्फीबाबतचं मत नकारात्मक असल्याचं समोर आलं. सेल्फीच्या नकारात्मक परिणामांशी हे 82 टक्के लोक सहमत झाले. हेच 82 टक्के लोक सोशल मीडियावर सेल्फीऐवजी इतर फोटो पाहाण्यास पसंती देतात.