मुंबई: पक्षांचं हवेत उड्डाण घेणे, पंख पसरवून हवेत भरारी घेणं हा मानवासाठी नेहमीच औत्सुक्याचा विषय ठरला आहे. त्यातूनच विमानाचा शोध लागला. आता रोबोट आणि ड्रोन तयार करणाऱ्या कंपन्यांची त्यावर नजर गेली आहे. फेस्टो या जर्मन ऑटोमेशन कंपनीने असाच एक रोबोट बर्ड तयार केला असून बायोनिकस्विफ्ट्स (BionicSwifts) असं त्याचं नाव आहे. विशेष म्हणजे हा रोबोट बर्ड गोल्फ बॉलच्या वजनाहून कमी वजनाचा आहे. 


कसा आहे रोबोट बर्ड?
रोबोट बर्डचे वजन केवळ 42 ग्रॅम इतकं आहे. त्यामध्ये वापरण्यात आलेल्या बॅटरीचे वजन हे 6 ग्रॅम इतकं आहे. हे रोबोट बर्ड्स पाचच्या संख्येमध्ये, एकमेकांच्या सहकार्याने काम करतात. या रोबोट बर्डचे पंख हे खऱ्या पक्ष्याप्रमाणेच फडफड करतात. रोबोट बर्डच्या पंखातले प्रत्येक पीस हे अल्ट्रालाईटपासून तयार करण्यात आले असून प्रत्येक पीस हे दुसऱ्या पीसच्या वरती बसवण्यात आलं आहे. रोबोट बर्ड उडताना त्याच्या पंख्यांच्या फडफडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोटार बसवण्यात आली असून इतर दोन मोटारींच्या मदतीने रोबोट बर्ड हवेत झेप घेऊ शकतं. 


 






रोबोट बर्डचे फ्लायर्स हे जवळपास 17.5 इंचाचे असून त्याच्या पंखांची लांबी 27 इंच इतकी आहे. याची चाचणी केल्यानंतर ते सलगपणे सात मिनीटापर्यंत हवेत उडते राहू शकतात हे स्पष्ट झालं आहे. 


रेडिओ-आधारित इनडोअर GPS यामध्ये बसवण्यात आलं असून त्या माध्यमातून प्रत्येक बायोनिकस्विफ्ट या रोबोट बर्ड्सचे युनिट शोधण्यात मदत करते. यामुळे हे रोबोट बर्ड्स एका समन्वित पद्धतीने उड्डाण करू शकतात. सेटअपमध्ये दिलेल्या जागेत काही रेडिओ मॉड्यूल्स बसवलेले असतात आणि प्रत्येक पक्ष्याला एक रेडिओ मार्कर असतो जो बेसवर सिग्नल पाठवतो. त्या पिंग्सच्या आधारे, प्रणाली प्रत्येक पक्ष्याचे अचूक स्थान शोधू शकते. 


नेव्हिगेशन सिस्टम म्हणून काम करणार्‍या मास्टर कम्प्युटरवर यो रोबोट बर्ड्सचा डेटा पाठवला जातो. त्याचा वापर करुन ही प्रणाली पक्ष्यांना प्री-प्रोग्राम केलेल्या मार्गावर उड्डाण करण्यास सांगू शकते. जर वारा किंवा इतर सभोवतालच्या काही स्थितीमुळे त्या मार्गापासून दूर गेले तर रोबोट बर्ड्स स्वायत्तपणे त्यांचा मार्ग दुरुस्त करू शकतात


फेस्टो या कंपनीने या आधीही असे अनेक प्रयोग केले असून त्यांनी फुलपाखरू, फ्लाईंग पेंग्विन आणि एअरबोन जेलीफिश यापासून प्रेरणा घेत रोबोट बनवले आहेत.