नवी दिल्ली : जगभरातील खेड्या-पाड्यांमध्ये इंटरनेट पोहोचवण्याच्या फेसबुकच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचं पाऊल आता भारताच्या दिशेने पडलं आहे. भारतात मोफत इंटरनेट सुविधा सुरु करण्यासाठी फेसबुकने भारतीय टेलिकॉम कंपन्यांशी चर्चाही सुरु केल्याची माहिती मिळते आहे.


जून 2016 मध्येच फेसबुकने आपलं ओपेन सेल्युलर लॉन्च केलं होतं. यातील 'एक्वीला' नावाच्या ड्रोनच्या माध्यमातून दूरवरील गावांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्याची योजना आहे.

काही दिवसांपूर्वी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी 'ओपेन सेल्युलर' लॉन्च केल्यानंतर ऑफिशियल फेसबुक पेजवरुन माहिती दिली होती की, "ज्या ठिकाणी अद्याप इंटरनेट पोहोचलं नाहीय, त्या ठिकाणी इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी ओपेन सेल्युलर लॉन्च केलं आहे. चारशे कोटींहून अधिक लोकांकडे अद्याप बेसिक इंटरनेटही नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येतील लोकांपर्यंकत इंटरनेट पोहोचवणं, हे एक मोठं आव्हान आहे."

ओपेन सेल्युलर काय आहे?

आम्ही एक 'ओपेन सेल्युलर' डिझाईन केलं आहे. ही सिस्टम एखाद्या बुटाच्या आकारासारखी असेल. मात्र, या सिस्टमच्या माध्यमातून 10 किलोमीटरच्या अंतरावरील जवळपास 1500 लोकांना इंटरनेट सुविधा मिळू शकेल. 'ओपेन सेल्युलर' सौर ऊर्जेवर चालणारी 'एअरक्राफ्ट एक्विला' आणि 'हाय बीम बँडविथ' असलेली सिस्टम आहे. याच माध्यमातून जगभरातील खेड्या-पाड्यांना इंटरनेटने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

याआधी फेसबुकच्या 'फ्री बेसिक्स' मोहिमेला नेट न्युट्रॅलिटीच्या नियमामुळे रोखण्यात आले होते. त्यामुळे 'ओपेन सेल्युलर' भारतात यशस्वी होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.