मुंबई : ट्रायच्या निर्देशानंतर रिलायन्स जिओनं आपली समर सरप्राईज ऑफर मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र जिओची ही ऑफर अजूनही सुरु असल्याचं बोललं जात आहे. जिओनं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात येत्या काही दिवसात ही ऑफर मागे घेण्यात येईल असं सांगण्यात आलंय.

रिलायन्स जिओच्या समर सरप्राईज ऑफरच्या माध्यमातून जूनपर्यंत मोफत डेटा आणि कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती. मात्र यावर आक्षेप घेत काही टेलिकॉम कंपन्यांनी ट्रायकडे तक्रार केली. त्यानंतर ट्रायनं जिओला ही ऑफर मागे घेण्याची सूचना केली. या सूचनेनंतर जिओनं ऑफर मागे घेत असल्याचं जाहीर केलं, सोबतच येत्या काही दिवसांमध्ये ही ऑफर बंद करण्यात येईल असंही नमूद केलं.



जिओची समर सरप्राईज ऑफर कोणत्याही क्षणी बंद करण्यात येईल. त्यामुळे जिओच्या ग्राहकांनी रिचार्ज करुन ही ऑफर मिळवण्याचा चंगच बांधला आहे. जोपर्यंत जिओ ही ऑफर बंद करत नाही, तोपर्यंत रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर अंतर्गत 3 महिने मोफत डेटा आणि कॉलिंग मिळणार आहे.

काय आहे ट्रायची सूचना?

ट्रायनं रिलायन्स जिओला समर सरप्राईज ऑफर मागे घेण्याची सूचना केली होती. कोणत्याही टेलिकॉम कंपनीला 3 महिन्यांहून अधिक प्रमोशनल ऑफर देता येत नाही. अशातच जिओनं ट्रायच्या सूचनेनंतर 31 डिसेंबरनंतर आपली वेलकम ऑफर 31 मार्चपर्यंत वाढवली होती. ट्रायच्या सूचनेनंतर जिओनं ही ऑफर मागे घेतली जाईल असं जाहीर केलं. तसंच कंपनीनं ही प्रमोशनल ऑफर नसून स्पेशल बेनिफिट ऑफर असल्याचं म्हणलं आहे.

काय आहे समर सरप्राईज ऑफर?

रिलायन्सनं 31 मार्चनंतर मोफत डेटा आणि कॉलिंग मिळवण्यासाठी समर सरप्राईज ऑफर जाहीर केली. यात 99 रुपयांचं रिचार्ज करुन प्राईम मेंबरशिप घेणं ग्राहकांना बंधनकारक होतं. तसंच 303 किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचं रिचार्ज करणंही गरजेचं होतं. 15 एप्रिलपर्यंत 303 चं रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर अंतर्गत जूनपर्यंत मोफत डेटा देण्यात येणार होता.