मुंबई: ऑनलाईन शॉपिंगच्या युगात काहीजण रोज विविध वस्तूंची खरेदी करतात. या व्यवहारात ते डेबिट अथवा क्रेडीट कार्डचा सर्रास वापर करताना दिसतात. कारण डेबिट कार्डवर अनेक कंपन्यांकडून कॅशबॅकची ऑफर दिली जाते. पण नुकतीच एक अशी घटनासमोर आली आहे, ज्यातून कॅशबॅक रकमेवर टॅक्स भरावा लागू शकतो. मुंबईतील एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याला यासंदर्भात आयकर विभागाकडून नोटीस मिळाली.
आयकर विभागाकडून मिळालेल्या नोटिसीमध्ये आयकर विभाग त्यांच्या खात्याची चौकशी करणार आहे. ही नोटीस मिळताच या बँक अधिकाऱ्याने आपल्या चार्टर्ड अकाऊंटंटशी संपर्क साधला. यावेळी त्याच्या खात्यात फक्त 1500 रुपयांची अधिकची रक्कम मिळाली. याचा उल्लेख आयकरच्या विवरण पत्रात केलेला नव्हता.
या बँक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याला ही रक्कम डेबिट कार्डाद्वारे केलेल्या खरेदीनंतर मिळणाऱ्या कॅशबॅक ऑफरमार्फत मिळाली. ही रक्कम खूप लहान असल्याने त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. या रकमेमुळेच आयकर विभागाने त्यांना डिमांड नोटीस पाठवल्याचं त्यांनी सांगितलं.
चार्टर्ड अकाऊंटन्सच्या मते, सध्या खरेदीवेळी अनेकांची नजर ही कॅशबॅक ऑफरकडे असते. पण काही हिशेबात ही कॅशबॅक रक्कम 'सोर्स ऑफ इनकम' म्हणूनही गणली जाऊ शकते, याकडे हे ग्राहक सहज दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यावर कर भरावा लागतो.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमान तिकीट, परदेशातील हॉटेल बुकिंग आदींसारख्या कन्ज्यूमर ड्यूरेबल्सच्या ऑनलाईन बुकिंगवर 100 टक्के कॅशबॅक रक्कम ही मोठी असल्याने त्याची नोंद विवरण पत्रात न केल्यास फटका सहन करावा लागू शकतो.