मुंबई : सॅमसंग आणि अॅपल या दोन प्रसिद्ध कंपन्यांच्या हँडसेटच्या स्फोटाच्या घटना घडल्यानंतर आता रिलायन्सच्या स्मार्टफोनच्या स्फोटाची घटना समोर आली आहे. रिलायन्स 4G LYF स्मार्टफोनचा स्फोट झाल्याचा दावा तन्वीर सादिक यांनी ट्विटरवरुन केला आहे. तन्वीर सादिक हे जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे विद्यमान अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांचे राजकीय सचिव आहेत.


तन्वीर सादिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "आज मी आणि माझं कुटुंब अगदी थोडक्यात बचावलो. माझ्याकडे असलेल्या रिलायन्स LYF स्मार्टफोनचा स्फोट होऊन, त्याला आग लागली."


या ट्विटसोबत तन्वीर सादिक यांनी स्फोट झालेल्या स्मार्टफोनचा फोटोही पोस्ट केला आहे. यावेळी तन्वीर यांनी रिलायन्सच्या इतर स्मार्टफोन यूझर्सना सतर्क करत म्हटलं आहे, "जे कुणी रिलायन्सचा लाईफ स्मार्टफोन वापरत असतील, त्यांनी सावधगिरी बाळगावी."


तन्वीर यांच्या ट्विटनंतर रिलायन्सने ट्विटरवरुनच त्यांना विनंती करुन या घटनेसंदर्भात संपूर्ण माहिती मागवली आहे. कंपनीकडून संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असं आश्वासनही ट्विटरवरुन देण्यात आले आहे.



रिलायन्स लाईफ स्मार्टफोनच्या स्फोटाची ही पहिलीच घटना आहे. ग्राहकांचं हित आमच्यासाठी कायमच महत्त्वाचं राहिलं आहे. त्यामुळे या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि त्यानुसार पुढील पावलं उचलली जातील, अशी माहितीही रिलायन्सकडून देण्यात आली आहे.