आयफोन 8 मध्ये वायरलेस चार्जिंग फीचर?
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2017 09:28 AM (IST)
नवी दिल्ली : आयफोनचा कोणताही फोन बाजारात येण्याअगोदर त्याच्या अॅडव्हान्स फीचर्सची चर्चात जास्त असते. आता अॅपलच्या आयफोन 8 या आगामी फोनमध्ये वायरलेस चार्जिंग फीचर असण्याची शक्यता वर्तवली आहे. आयफोन 8 मध्ये असं कॅमेरा फीचर असेल, जे चेहऱ्याचे हावभाव पाहूनच फोटो घेईल, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होती. शिवाय आयफोनच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये लाईट्स फीचर अॅडव्हान्स्ड असतील, असं बोललं जात आहे. आयफोन 8 मध्ये टच आयडी असून यातील एकमेव बटण गायब होईल, आणि स्क्रीनचा आकारही मोठा असेल, अशी अफवा आहे. त्यामुळे या वर्षात लाँच होणारा हा फोन कसा असेल, याविषयी मोठी उत्सुकता लागली आहे. मात्र त्यापूर्वी वायरलेस चार्जिंग हे फीचर चांगलंच चर्चेत आहे. फोन चार्जिंगला लावाल, त्या ठिकाणापासून 15 फूट दूर अंतरावरही मोबाईल चार्ज होईल, अशी अफवा आहे. त्यामुळे आयफोन 7 पेक्षा आयफोन 8 मध्ये काय नवे बदल असतील, ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.