स्टॉकहोम (स्वीडन):   'द रॉयल स्वीडीश अकॅडमी ऑफ सायन्सेस'द्वारे भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या २०१९च्या 'नोबेल पुरस्कारा'साठी तीन शास्त्रज्ञांना विभागून जाहीर झाले आहे. अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील जेम्स पिबल्स यांना पारितोषिकाचा निम्मा भाग, तर स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा विद्यापीठातील मिशेल मेयर आणि याच विद्यापीठातील तसेच इंग्लंडमधील कॅम्ब्रिज विद्यापीठात अध्यापन करणारे डिडीयर क्वेलोज यांना पारितोषिकाचा उर्वरित निम्मा भाग विभागून जाहीर करण्यात आला आहे.


विश्वाची उत्क्रांती आणि ब्रह्मांडातील पृथ्वीचे स्थान यांच्या आकलनात योगदान दिल्याबद्दल हे पारितोषिक जााहीर करत असल्याचे या अकादमीनं आपल्या प्रसद्धीपत्रकात म्हटले आहे.

आपल्या विश्वाची उत्पत्ती, उत्क्रांती आणि स्वरूप तसंच इतिहास व आपल्या सौरमालेबाहेरील सूर्यासमान ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध, यासंबंधीच्या मूलभूत संशोधनाचा सन्मान यंदाच्या पारितोषिकाद्वारे करण्यात आला आहे, असं नोबेल निवड समितीनं आपल्या अभिप्रायात म्हटलं आहे. ब्रह्मांडाच्या प्रारंभी कशी स्थिती होती, नंतर काय झालं? अथांग पसरलेल्या विश्वात अन्य ताऱ्यांभोवती फिरणारे अन्य ग्रह असतील का? अशा मानवाच्या आणि विश्वाच्या अस्तित्वाशी संबंधित मूलभूत प्रश्नांना उत्तर देण्यात या शास्त्रज्ञांनी महत्वाचं योगदान दिल्याची प्रशंसाही निवड समितीनं केली आहे.

या पारितोषिकाची एकूण रक्कम ९ दशलक्ष स्वीडीश क्रोना (सुमारे 6.50 कोटी रूपये) असून, पुरस्कारार्थींना निर्धारीत प्रमाणात प्रदान करण्यात येईल.