मुंबई: इंटरनेटची नवी पावलं पडत असताना 2000 साली एक फोटो सर्वत्र फार चर्चेत होता, हॉलिवूड अभिनेत्री आणि पॉप सिंगर जेनिफर लोपोजनं ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये घातलेल्या ड्रेसचा तो फोटो होता. वर्साचे या ब्रॅंडचा हिरव्या रंगाचा गाऊन सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा होता. याची कमाल अशी की 2000 साली गुगलवर सर्वाधिक सर्च झालेला हा ड्रेस ठरला.


शुक्रवारी झालेल्या मिलान फॅशन विकमध्ये जे-लोने हाच ड्रेस घालून रॅम्पवॉक केलं. तब्बल 19 वर्षांपूर्वीचं जेनिफरचं डॅशिंग लूक पुन्हा एकदा पाहून सर्वांच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यावेळी गुगल सर्च केल्यानंतर फक्त लिंक्सचाच ऑप्शन उपलब्ध होता, त्यामुळे युजर्सना प्रत्येकवेळी लिंकवर क्लिक करावं लागत होतं. यावर उपाय म्हणून गुगलने चक्क एक नवं फिचर तयार केलं, 'गुगल इमेजेस'. गुगल इमेजेसचं फिचर गुगलसाठी फार फायद्याचं ठरलं. आजही आपल्याला सहजरित्या गुगलवर फोटोजचं सेक्शन उपलब्ध असण्यामागे ही कहाणी आहे.



जेनिफरचं वय तब्बल 50 वर्ष आहे, फॅशन आणि स्टाईलिंगचा तिचा तोच अंदाज आजही तसाच आहे. वर्साचेच्या ग्रीन ड्रेसने जे-लोचा एव्हरग्रीन अंदाज सर्वांनाच ताजं करुन गेला. 19 वर्षांपूर्वी याचा इतका प्रभाव इंटरनेटवर दिसेल याचा अंदाज कुणालाच नव्हता, स्वत: जेनिफर लोपेजलाही नव्हता. मात्र या फोटोनं दाखवून दिलं की युजर्स इंटरनेटचा कशा प्रकारे वापर करतात.


आज गुगल फोटो फिचर एकाच वेळी करोडो युजर्स वापरत असतात. कोणत्याही प्रकारची माहिती असो, सेलिब्रिटींचे फोटो असो वा कोणतीही ऐतिहासिक ठिकाणं असो, माहिती वाचली तरी फोटो पाहिल्यावर युजर्सना दिलासा मिळतो हे खरंच आहे.