कोल्हापूर : कोल्हापुरातल्या चिंचवडच्या अभिनंदन पाटील या तरुण शेतकऱ्याने ढोबळी मिरचीच्या माध्यमातून यशस्वी शेती करुन दाखवली आहे. कमी जागेत लाखोंमध्ये उत्पन्न मिळवून इतर तरुणांसमोर अभिनंदन पाटील आदर्श बनला आहे.
स्थानिक ऊसाला भाजीपाल्याचा पर्याय
अभिनंदनला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. मात्र, शिक्षण सुरु असल्यानं शेतीत लक्ष देता येत नव्हतं. 2005 साली अभिनंदनचं बी.कॉम पूर्ण झालं. मात्र त्याच वर्षी अभिनंदनच्या वडिलांचं निधन झालं आणि शेतीची सगळी जबाबदारी अभिनंदनवर येऊन पडली. यानंतर अभिनंदननं शेतीत पूर्णवेळ लक्ष घालायला सुरुवात केली. स्थानिक ऊस पिकाला भाजीपाला पिकांचा पर्याय दिला.
50 गुंठ्यात ढोबळी मिरची, तर 35 गुंठ्यात मिरची
यंदा जानेवारी महिन्यात अभिनंदनं आपल्या 50 गुंठे क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवड केली. तर राहिलेल्या 35 गुंठ्यात हिरव्या मिरचीची लागवड केली.
जमिनीची योग्य मशागत
मिरचीच्या लागवडीपूर्वी अभिनंदननं जमीन चांगली नांगरुन घेतली. त्यात डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पेढ, करंजी पेंढ या खतांचे बेसल डोस दिले आणि बेड तयार केले.
50 गुंठ्यात ढोबळी मिरचीची 17 हजार रोपांची लागवड
पाण्याच्या बचतीसाठी त्यावर ठिबकच्या लॅटरल अंथरल्या. मल्चिंग पेपर अंथरुन त्यावर ढोबळी मिरचीच्या रोपांची रोवण केली. 50 गुंठ्यासाठी अभिनंदनला ढोबळी मिरचीची 17 हजार रोपं लागली.
35 गुंठ्यात VNR-109 जातीच्या मिरचीची लागवड
तर उरलेल्या 35 गुंठ्यात याच पद्धतीनं व्हीएनआर-109 या जातीच्या मिरचीच्या रोपांची लागवड केली. लागवडीनंतर दर चार दिवसांनी किडनाशक आणि बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या. लागवडीनंतर 45 दिवसांनी मिरची तोडणीस तयार झाली. पहिल्याच तोड्याला 300 किलो ढोबळी मिरचीचं, तर 150 किलो मिरचीचं उत्पादन मिळालं. आठवड्यातून एकदा या मिरचीची तोडणी केली जाते आणि ही मिरची पोत्यात भरून सांगली बाजारपेठेत पाठवली जाते.
ढोबळी मिरचीला किलोमागे 40-45 रुपयांचा दर
आतापर्यंत ढोबळी मिरचीचे 5 तोडे झाले असून, त्यातून 10 टन ढोबळी मिरचीचं उत्पादन मिळालं आहे. याला सांगली बाजारपेठेत किलोमागं 40 ते 45 रुपयांचा दर मिळाला आहे.
50 गुंठ्यातून 16 लाखांचं उत्पन्न
अजून दोन ते अडीच महिने यातून उत्पादन सुरु राहणार असून अभिनंदनला यातून 30 टन ढोबळी मिरचीच्या उत्पादनाची अपेक्षा आहे. ज्याला 40 रुपयांचा जरी दर मिळाला, तरी या प्लॉटमधून त्यांना 16 लाखांचं उत्पन्न मिळेल.
खर्च वजा केल्यास 11-12 लाखांचा निव्वळ नफा
यातून रोपं, खतं, किडनाशक, ठिबक, वाहतूक, मजूरी असा साडेचार लाखांचा खर्च वजा जाता अभिनंदनला 11 ते 12 लाखांचा निव्वळ नफा होणार आहे.
मिरचीला किलोमागे 50-55 रुपयांचा दर
मिरचीचे आतापर्यंत 4 तोडे झाले असून, यातून 8 टन मिरचीचं उत्पादन मिळालं आहे. या मिरचीला सांगली बाजारात किलोमागं 50 ते 55 रुपयांचा दर मिळाला आहे.
मिरची पिकातून 8 लाखांचा निव्वळ नफा
अजून 6 महिने या मिरचीच उत्पादन सुरु राहणार असून यातून 12 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा अभिनंदनला आहे. यातून रोपं, खतं, किडनाशकं, मजूरी, वाहतूक असा सगळा मिळून 4 लाखांचा खर्च वजा जाता अभिनंदनला 8 लाखांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे.
म्हणजेच या दोन एकरातून अभिनंदनला यंदा 18 ते 20 लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.
इतर पिकांपेक्षा भाजीपाला पिकाला अतिरिक्त कष्ट घ्यावे लागतात, तर बाजारातील पडणाऱ्या दराचाही धोका असतो. मात्र, हा धोका पत्कारुन अभिनंदननं भाजीपाला पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. ज्याचा फायदा त्याला यंदा नक्कीच झाला आहे.