नागपूर : पावसाळ्याच्या कालावधी असल्याने विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाड्यात जोखीमग्रस्त घटक, डोंगराळ भाग, पुरग्रस्त भाग, भटकंती करणाऱ्या लोकांच्या वस्त्या, विजभट्टी, बांधकाम सुरु असलेला भाग, तात्पुरता स्वरुपाची झोपडया, रस्त्यावर राहणारी बालके, अनाथ बालके, पाणी पुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेले क्षेत्र यावर विशेष लक्ष द्यावे. पाच वर्षाखालील बालकांच्या पालकांना या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले.


एक ते पंधरा जुलै या कालावधी दरम्यान जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्याबोलत होत्या. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, आरोग्य उपसंचालक डॉ. विनिता जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


दुषित पाण्यामुळेच अतिसार तसेच इतर रोग होतात. पिण्याचे स्वच्छ पाणी नागरिकांना मिळेल यावर पाणी स्वच्छता विभागाने लक्ष केंद्रीत करावे. त्याच बरोबर कूलर मधील पाणी काढून घेण्याच्या सूचना त्यांनी नागरिकांना दिल्या. सर्व नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा. हात स्वच्छ धुवावे, जेणे करुन अतिसारासारख्या रोगास बळी पडणार नाही. सुयोग्य व वेळेत उपचार केल्यास निश्चित अतिसार आटोक्यात येवू शकतो, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. अतिसार नियंत्रण पंधरवाडाचा उद्देश बालमृत्यु शुन्यावर पोहचविणे आहे. 


पाच वर्षे पेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरामध्ये ओआरएसचा वापर करावा. अतिसार प्रतिबंधासह जलशुष्कता असलेल्या बाल रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. त्याबरोबरच अतिसार प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी मोठया प्रमाणावर जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यासोबतच कोविड काळाप्रमाणे स्वयंसेवी संघटनांना प्रशिक्षण देवून त्यांना या कार्यात सहभागी करावे, असेही त्यांनी सांगितले. या पंधरवाडया दरम्यान आशा सेविका व अंगणवाडी सेविका घरोघरी जावून जनजागृती करणार असून ओआरएस व झिंकच्या गोळया वाटप करणार आहेत. अतिसाराच्या उपचारासाठी ओआरएस व झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार आहे. असे सदस्यांनी सांगितले.