Vitthal Rukimini Mandir, Pandharpur : देशभरातील भाविकांसाठी मोठी खुशखबर असून आता विठ्ठल मंदिरात केव्हाही आलात तरी तुम्हाला देवाच्या चरणावर तुळशी वाहून तुळशी अर्चन पूजा करता येणार आहे. येणाऱ्या गुढी पाडव्यापासून तुळशी अर्चन पूजेस पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. हा निर्णय आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. देशभरातील भाविक पंढरपूरला आल्यावर अनेकांना देवाची पूजा करण्याची इच्छा होत असते. नंतर सध्या रोज एक नित्यपूजा आणि 10 पाद्यपूजा एवढ्याच पूजा होत असून याचेही वर्षभराचे बुकिंग खूप आधीच होत असल्याने भाविकांना देवाची पूजा करण्याची इच्छा पूर्ण करता येत नव्हती. आत रोज देवाची तुळशी अर्चन पूजा करण्याबाबत निर्णय झाल्याने आलेल्या भाविकांना ही पूजा करता येणार आहे . 


यासाठी विठ्ठल सभामंडपात बसून विष्णूसहस्त्र नाम म्हणत पुजारी देवाच्या उत्सव मूर्तीवर संकल्प सोडून पूजा संपल्यास मुख्य विठ्ठल मूर्तीवर गाभाऱ्यात जाऊन या भाविकांना या तुळशी विठुरायाच्या पायावर वाहून दर्शन घेता येणार आहे. यामुळे दर्शन रांगेतील भाविकांनाही त्रास होणार नसून भाविकांना तुळशीपूजा केल्याचा आनंद देखील घेता येणार आहे. शिवाय गर्दीच्या वेळी तासंतास दर्शन रांगेत न थांबता त्या भाविकांच्या कुटुंबाला दर्शन आणि पूजा हे दोन्ही होणे शक्य होणार आहे. दर्शनाला आल्यावर देवाची पूजा करता यावी ही अनेक दिवसांची मागणी यामुळे पूर्ण होणार असून रोज किती पूजा ठेवायच्या आणि यासाठी किती देणगी ठेवायची यावर अजून निर्णय झालेला नसला तरी पाडव्यापासून या पूजा सुरु होणार आहे.  येत्या दोन दिवसात बाकीची माहिती दिली जातील असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले . 


दरम्यान कायम वादात अडकलेल्या विठ्ठल लाडू प्रसादाचा ठेका रद्द करण्याचा निर्णय झाल्याची माहिती देखील मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. या ठेकेदाराकडून स्वच्छतेचे नियम पळाले जात नसल्याच्या बातम्या ABP माझाने दिल्यावर त्याला केवळ करणे दाखवा नोटीस देण्यात येत होत्या. ऐन आषाढीच्यावेळी या ठेकेदाराच्या कारखान्यावर वजन मापे अधिकाऱ्यांनी छापा टाकून तपासणी केली असता लाडू देखील कमी वजनाचे असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याला दंड केला होता. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कमी प्रतीचा लाडू देऊनही लाडूंची संख्या कमी पडल्याने भाविकांना प्रत्येकवेळी देवाचा प्रसाद न घेता परतावे लागले होते. माझाने वारंवार हे वास्तव दाखवल्यावर अखेर मंदिर समितीने हे लाडू प्रसादाचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आता मंदिर प्रशासनाकडूनच लाडू बनविले जाणार आहेत. आता भाविकांना चांगल्या दर्जाचा लाडू प्रसाद दिला जाणार असून मंदिर समितीला एखादा मोठा देणगीदार मिळाल्यास प्रत्येक भाविकांना मोफत लाडू प्रसाद देण्याचा विचार असल्याचेही मंदिर समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.