Solapur News : गेल्या 15 दिवसांपूर्वी फुटलेल्या उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालव्याचे (Ujani Irrigation Department Right canal) काम कासव गतीनं सुरु आहे. उजनीचा कॅनल फुटून मोहोळ (Mohol) तालुक्यातील पाटकुल (Patkul) या गावातील शेकडो एकर शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं. परंतू, कॅनल फुटून 15 दिवस झाले तरी पाटबंधारे विभागाने मरगळ झटकलेली दिसत नाही. पाटबंधारे विभागाच्या मेकॅनिकल युनिटचे काम संथ गतीनं सुरु आहे. हे काम असंच सुरू राहिलं तर पुढील एक महिनाभर तरी शेतकऱ्याला पाणी मिळणे अशक्य आहे.  त्यामुळं तत्काळ हे काम पूर्ण करावं अशी मागणी पंढरपूर तालुक्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana) अध्यक्ष आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील (Sachin Patil) यांनी केली आहे.


पाण्याविना पिकं लागली सुकू 


उन्हाळ्याच्या तोंडावर कॅनल फुटल्यामुळं कॅनलच्या कार्यक्षेत्रात असणारी पिकं आता सुकू लागली आहेत. त्यामुळं उजनी पाटबंधारे विभागाने तत्काळ खासगी यंत्रणा घेऊन रात्रंदिवस हे काम चालू ठेवून कॅनल दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी केली आहे. उजनी कॅनलचे दुरुस्तीचे बरेच काम बाकी आहे. कॅनलच्या साईटला झाडेझुडपे वाढली आहेत. तसेच काँक्रिटीकरणची दुरुस्तीही बाकी आहे. याकडं दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच ही घटना घडल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. याआधी या कालवा दुरुस्तीचे किती टेंडर निघाले आहेत, त्यावर किती पैसे खर्च झाले आहेत याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. कारण आजपर्यंतचा मेंटेनन्स हा कागदावर झालेला दिसतोय प्रत्यक्षात मात्र संपूर्ण कॅनॉलची दुरावस्था झाली असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे.




कागदावरच कॅनलची देखभाल दुरुस्ती केली का?


आता जरी एक ठिकाणी कॅनल फुटला असेल परंतू, आत्ताही अनेक ठिकाणी कधीही कुठे कॅनल फुटू शकतो अशी अवस्था या उजनी कॅनॉलची झाली आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी डोळेझाक करत आहेत. मागील काही दिवसापूर्वी उजनी कॅनॉलच्या दुरुस्तीचे आणि झाड झुडपं काढण्याचे तीस ते चाळीस कोटीचे टेंडर मंजूर झाले होते. परंतू, त्यामध्ये कुठेही काम दिसत नाही, प्रत्यक्षात पाण्याची पाळी सुटण्याआधी ही सर्व दुरुस्तीचे कामे होऊन कॅनलच्या साईटपट्टीवरील झाडे झुडपे काढून रस्ते दुरुस्ती होणे गरजेचे होतं. परंतू, ते झालेलं दिसत नाही. उजनी विभागाचे अधिकारी आणि टेंडर ठेकेदाराने संगनमत करुन कागदावरच कॅनलची देखभाल दुरुस्ती केली का? याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सचिन पाटील यांनी केली आहे. 


आठ ते दहा दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन करणार, स्वाभिमानीचा इशारा


उजनी कॅनॉलला पुढील शेतकऱ्यांना तत्काळ पाणी द्यायचे असेल तर ज्या ठिकाणी कॅनल फुटला आहे त्याच्या पाठीमागील गेट डाऊन करून तिथून वरील कॅनलचे भरणे पाणी देऊन काढले पाहिजे. म्हणजे दुरुस्ती झाल्या झाल्या कॅनल फुटल्याच्या पुढील शेतकऱ्यांना तत्काळ पाणी मिळेल. जर हे काम पुढील आठ ते दहा दिवसात पूर्ण न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार आहे.  त्यावेळी होणाऱ्या नुकसानीस कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग जबाबदार असेल असा इशारा सचिन पाटील यांनी दिला आहे. 




शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली 


पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा (Ujani Irrigation Department Right canal)  29 जानेवारीला फुटला होता. मोहोळ (Mohol) तालुक्यातील पाटकुल (Patkul) या गावात उजनी पाटबंधारे विभागाचा हा उजवा कालवा फुटला होता. हा कालवा फुटल्यामुळं शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतात पाणीच पाणी झालं आहे.  यामुळं शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंबासह ऊस आणि इतर पिके वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. शेतात पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान झालं होते. पाटकुल येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह विहिरींचं देखील मोठं नुकसान झालं होतं. शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेलं होतं. 


महत्त्वाच्या बातम्या:


उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला, शेकडो एकर शेती पाण्यात; ऊसासह द्राक्ष डाळिंबाचं मोठं नुकसान