Maharashtra Solapur News Updates: एका बाजूला चांद्रयान (Chandrayaan-3) चंद्रावर पोहोचलं असताना आजही महाराष्ट्राच्या मातीतल्या अनेक परंपरा ग्रामीण भागानं जतन करुन ठेवल्याचं आपल्याला पहायला मिळतंय. मोबाईलच्या आभासी विश्वात तरुणाई हरकून गेली आहे. माळशिरस तालुक्यातील निमगावमध्ये हिच तरुणाई वावड्याच्या खेळात रंगून गेलेलं अनोखं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या शेकडो वर्षाची ही परंपरा आजही येथील तरुणाई जपत आहे. महाराष्ट्रात बहुदा या एकाच गावात या अजस्त्र पतंग अर्थात वावडीच्या खेळाची प्रथा सुरू असल्याचं दिसतं. 


वावड्या उडविणं या शब्दाचा मराठी अर्थ तसा अफवा पसरविणं किंवा थापा मारणं असा असला तरी ज्यावरून हा शब्द रूढ झाला, तोच हा वावड्याचा खेळ होय. आपल्या देशात सर्वत्रच पतंग उडविले जातात मात्र वावड्या ही भानगड फारच वेगळी आहे. वावडी म्हणजे, भले मोठे म्हणजे 5 फुटांपासून 30 फुटांपर्यंतचे अजस्त्र पतंग... याला उडवायला लागतं 30 ते 40 जणांचे टोळकं आणि बोटभर जाडीचा कासरा... अशी ही भन्नाट वावडी उडवायलाही लागतं मोकळं माळरान... हे सर्व पाहायला मिळतं, ते माळशिरस तालुक्यातील निमगावात. अजस्त्र वावड्या कशा वाऱ्याशी स्पर्धा करतात, ते पाहून डोळ्याचं पारणंच फिटतं. 
     
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील निमगाव नगराचं नाव महाराष्ट्राला कुस्तीमुळे ओळखलं जात असलं तरी कुस्तीसोबत इथला गझी ढोल आणि वावड्या देखील तेवढ्याच प्रसिद्ध आहेत. अनेक पिढ्यापासून चालत आलेल्या परंपरा संपूर्ण गावानं मिळून साजऱ्या करायची प्रथा पडलीय, म्हणूनच श्रावण महिन्यात हा वावड्याचा खेळ खेळाला जातो. वावड्यांवर लिहिलेले संदेश आणि घोषणाही आकर्षक असतात.



 


वावडी बनविणं हे अतिशय कौशल्याचं काम असतं, उंच हवेत तिला पोहोचवण्यासाठी वावडीचं वजन समतोल राहणं अत्यंत आवश्यक असतं. वावडी बनवताना अखंड बांबू किंवा वेळूचा वापर करतात. हा वेळू पाण्यात 2 दिवस भिजत ठेवून बाहेर काढून घेतात. तो सरळ उभा चिरून एक सारख्या आकाराच्या त्याच्या कामठ्या काढल्या जातात, त्यास आयताकृती आकारानुसार या कामठ्या जोडल्या जातात, बरोबर मधली कामठी बाहेर काढून त्यास चंग बांधले जातात, दोरा आणि सुतळीच्या साहाय्यानं ही आयताकृती प्रतिमा तयार झाल्यानंतर त्यास वरून डिंक किंवा चिकट पदार्थाच्या सहाय्यानं एक फेटा किंवा धोतराचं कापड लावून वरून एक रंगीबेरंगी कागद लावला जातो आणि यावर  सामजिक संदेश रंगविला जातो.  


या वावडीस मंगळसूत्र असते,  ज्या दोरीच्या साहाय्यानं वावडी हवेत जाते, त्याला मंगळसूत्र म्हणतात. येथील अजस्त्र वावड्या हवेत उडवण्यासाठी आणि तिचा हवेत समतोल ठेवण्यासाठी तिचं मंगळसूत्र आणि खाली बांधलेली शेपूट अतिशय महत्वाची असते. अशा रीतीनं तयार झालेल्या मोठ्या वावड्या एखाद्या मंडपाच्या छताप्रमाणे दिसतात. यानंतर वावडीच्या आकारानुसार, त्यास दोरी लावून आकाशात उडविण्याची तयारी पूर्ण होते. इतक्या मोठ्या आणि वजनदार वावड्यासाठी 5 सेंटीमीटर जाडीची नायलॉन दोरी किंवा म्हशीला बांधायचा कासरा वापरण्यात येतो. वावड्या उडवणाऱ्या तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हलग्या, पिपाण्या, शिंगाडे, डफ यांचा गजर चालू होता.  


या वावड्या हवेत सोडणं देखील एक कला असते. वाऱ्याचा झोत आणि दिशा याचा विचार करून मोकळ्या रानात एका वावडीसाठी 40 ते 50 तरुण झटत असतात. काही वावडी धरून, काही त्याची शेपटी हातात धरून थांबतात. उरलेले 15 - 20 तरुण वावडीची दोरी लांबपर्यंत सोडवून उभे राहतात. वाऱ्याचा जोरदार झोत येताच ही वावडी हवेत उडवतात, तर बाकीचे तिची दोरी घेऊन पळत सुटतात. काही प्रयत्नानंतर अखेर यश येतं आणि या वावड्या हवेत झेपावू लागतात. जसजसा वाऱ्याचा दाब वाढेल तशा या वावड्या उंच आकाशात स्थिर होऊ लागतात. निमगावच्या आकाशात सायंकाळी सहापर्यंत 100 पेक्षा जास्त रंगीबेरंगी वावड्या वाऱ्याशी स्पर्धा करत उंच आकाशात उडत असतात. यातही काहींना अपयश येते तर काही वावड्या जवळपास 500 फुटांपेक्षा जास्त उंचावर जाऊन स्थिर होतात. या विविध रंगांच्या वावड्यांमुळे निमगाव परिसरातील आकाश रंगीबेरंगी बनून जातं. हा आगळा वेगळा रंगीबेरंगी वावड्याचा उंच आकाशातील खेळ पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिक येत असतात. या खेळातील सांघिक भावना पुढील वर्षभर गावाची एकी अबाधित राखण्यासाठी उपयुक्त ठरतं.