सोलापूर/पुणे : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील धावली धरणात बुडून 5 जणांचा मृ्त्यू झाल्याची भीषण दुर्घटना दुपारी घडली असतानाच आणखी एक दुर्घटना समोर आली आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील उजनी धरणात (ujini Dam) एक बोट बेपत्ता झाली असून ही दुर्घटना इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे या बोटीतून पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे बोट पलटी झाल्यानंतर पोहत-पोहोचत कळाशी गावच्या काठावर पोहोचले आहेत. राहुल डोंगरे हे काढावर पोहोचल्यांतर या घटनेचा उलगडा झाला. त्यानंतर, पोलीस (Police) प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बोटीची शोधमोहिम सुरू केली आहे. या बोटीतून 7 जण प्रवास करत होते. त्यापैकी, राहुल डोंगरे हे सुरक्षीत आहेत. मात्र, बोटीतील इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे.


इंदापूर तालुक्यातील कुगावं ते कळाशी या जलमार्गावरी ही बोट वाहतूक चालू होती. या बोटीतून एकूण 7 प्रवासी प्रवास करत होते. गावातील जोडपे, त्यांची दोन लहान मुले, एक पोलीस उप निरीक्षक, कूगाव येथील एक तरुण आणि बोट चालक, असे 7 प्रवासी संध्याकाळच्या सुमारास प्रवास करत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने ही दुर्घटना झाली. सायंकाळी सहाच्या दरम्यान सुटलेल्या वादळी वाऱ्याने बोट पलटली व सर्वच प्रवाशी पाण्यात बुडाले. यावेळी पोलीस उप निरीक्षकाने पाण्यात उडी टाकून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते पोहत-पोहोत काठावर आले. त्यामुळे, या घटनेची माहिती मिळाली. मात्र, अद्यापही बोटीतून प्रवास करणारे इतर 6 जण बेपत्ता आहेत. दरम्यान, आता शोधकार्यासाठी प्रशासन घटनास्थळावर दाखल झाले असून 2 तासानंतरही अद्याप बुडालेल्या एकाचाही शोध लागलेला नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे घटनास्थळी पोहोचले आहेत. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन बुडालेल्या प्रवाशांसाठी प्रार्थना केली आहे. 


मी बचाव कार्याचा आढावा घेत आहे - सुप्रिया सुळे


उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी, ता. इंदापूर येथे आज सायंकाळी वाहतूक करणारी एक बोट उलटली. या घटनेत काहीजण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. परंतु येथे मदत आणि बचावकार्य करण्यासाठी आणखी साधनसामग्रीची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी पुणे यांना विनंती आहे की आपण याची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. सदर घटना अतिशय गंभीर असून येथील मदत आणि बचाव कार्याचा मी सातत्याने आढावा घेत आहे. याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. बेपत्ता असणारे सर्वजण सुखरुप असावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना.