Shri Vitthal palkhi sohala  : आषाढी यात्रेला सर्व संतांच्या पादुका विठुरायाच्या भेटीला येतात. मात्र, कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणत आपल्या कामात विठ्ठलाला शोधणारे श्री संत सावता महाराज (Savata Maharaj) यांच्या भेटीला परंपरेप्रमाणं दरवर्षी विठुरायाचा पालखी सोहळा जातो. माढा तालुक्यातील अरण या सावता महाराजांच्या गावी देवाच्या पादुका आणल्या जातात. कोरोनाच्या संकटामुळं मागील दोन वर्ष हा सोहळा मर्यादीत स्वरुपात झाला. मात्र, यावर्षी कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळं हा सोहळ्या मोठ्या उत्सहात संपन्न होत आहे. भाविक विठुनामाच्या गजरात तल्लीन असल्याचे चित्र दिसत आहे.

  


125 वर्षाची परंपरा


कोरोनाच्या संकटामुळं मागच्या दोन वर्ष  विठुरायाचा पालखी सोहळा मर्यादीत स्वरुपात साजरा केला जात होता. मात्र, यंदा मोठ्या उत्साहत साजरा केला जात आहे. जवळपास 125 वर्षाची ही परंपरा पुन्हा उत्साहाने सुरु झाली आहे. आषाढी सोहळ्यासाठी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात मात्र, सावता माळी हे आपल्या शेतातच कष्ट करत देवाची आराधना करत असतात. यामुळं खुद्द विठुराया आषाढीनंतर सावता महाराजांच्या भेटीला जातात अशी मान्यता वारकरी संप्रदायात आहे. दरवर्षी पंढरपूरमधून काशी कापडी समाज देवाच्या पादुका घेऊन अरण येथे पायी पालखी सोहळा घेऊन जात असतो. यंदा दोन वर्षानंतर कोरोनाचे संकट गेल्यामुळं आणि निर्बंधमुक्त वातावरणात असल्यामुळं हरिनामाच्या गजरात विठुरायाच्या पादुकांचे सावता महाराजांच्या अरण गावाकडे प्रस्थान झाले. 




  
पालखी मार्गाची दुरावस्था


विठुरायाचा पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी मंदिर समितीने प्रयत्न करावेत अशी मागणी सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केली आहे. संत सावता महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी विठुरायाच्या पादुकांची आणि सावता महाराजांची अनोखी भेट होत असते. दरम्यान पंढरपूर ते अरण या पालखी मार्गाची देखील दुरावस्था झाली असून, शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी वारकऱ्यांमधून होत आहे. 




दरम्यान, यंदा आषाढी वारीला देखील वारकऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली. कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळं चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांचा मोठा मेळा भरला होता. गेल्या दोन वर्षापासून वारी करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, यावर्षी मोठ्या उत्साहात पंढरपूरचा आषाढी वारीचा सोहळा संपन्न झाला. 


महत्वाच्या बातम्या: