सोलापूर : कला माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असते. कलेतून अनेकांनी पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार मिळवले आहेत. परंतु, याच कलेमुळे एका चित्रकाराला डोळा मिळाला आहे. महेश मस्के असे या चित्रकाराचं नाव आहे. महेश हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील जामगाव या गावचे आहेत.  कलेची दखल घेऊन अमेरिकेतील डॉक्टरांनी डोळा दिला आणि महेश यांना जणू नवं आयुष्यच मिळालं. 


महेश हे लहानपणापासूनच एका डोळ्याने अंध आहेत. त्यांना चित्रकलेची आवड असून त्यांनी आजपर्यंत हजारो चित्रे रेखाटली आहे. परंतु, त्यांनी पिंपळाच्या पानावर रेखाटलेली चित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. महेश मस्के यांनी राजकीय नेते, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची चित्रे रेखाटली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते सयाजी शिंदे, उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांची छायाचित्रे महेश यांनी रेखाटली आहेत. 


अमेरिकेचे डॉक्टर बनले देवदूत 
 महेश यांनी वाराबीनंतर कला शिक्षक पदवीचे शिक्षण घेतले. महेश पेन्सिल स्केच तर अप्रतिम काढतातच. परंतु, पिंपळाच्या पानावर रेखाटलेल्या चित्रांमुळे  त्यांना  मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या या कलेची दखल चक्क अमेरिकेतील डॉक्टरांनी घेतली. या डॉक्टरांनी महेश यांना अमेरिकेहून पुण्याला येऊन कृत्रीम डोळा दिला. या डोळ्याने महेश यांना दिसत नाही. परंतु, त्यांचे दोन्ही डोळे आता एकसारखे दिसत आहेत. डोळा बसवल्यानंतर महेश यांनी पहिल्यांदा आरशात पाहिले त्यावेळी ते धाय मोकलून रडले. विशेष म्हणजे या डॉक्टरांनी महेश यांना हा डोळा कोणताही मोबदला न घेता बसवला आहे. पुण्यातील आर्मी हॉस्पिटलमधील डॉक्टर मोहसीन यांनी अमेरिकेतील या डॉक्टरांना महेश यांच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर डॉ. लिअम, डॉ. समीरा, डॉ. कोर्टनी आणि डॉ. ट्रेव्हर यांनी पुण्यातील आर्मी हॉस्पिटल येथे महेश यांच्यावर शस्त्रक्रिया केली.    


लहानपणापासून आवड
लहानपणी शेतात जनावरे राखण्यासाठी गेल्यानंतर तलावाशेजारी चिखलात पक्षी आणि प्राण्यांच्या पायांचे ठसे उमेटलेले असायचे. महेश हेच ठसे आहे तसे दुसरीकडे उमटवायचे. त्यातूनच त्यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. ही कला पुढे जोपासत त्यांनी अनेक बड्या लोकांची चित्रे रेखाटली आहेत. 


...आणि नवं आयुष्य मिळालं
आपल्याला कलेमुळं डोळा मिळाल्याच्या भावना महेश यांनी एबीपी माझासोबत बोलताना व्यक्त केल्या. "माझ्या कलेची दखल घेऊन अमेरिकेतील डॉक्टरांनी कोणताही मोबदला न घेता मला डोळा दिला. त्यामुळे आता लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. दीव्यांग असल्यामुळे मला आधी वाईट वाटत असे, शिवाय नकारात्मक विचार डोक्यात येत. कारण लोक मला इरांपेक्षा वेगळा समजायचे. त्यामुळे मी एकटा-एकटा राहू लागलो. परंतु, आता डोळा मिळाल्यामुळे मला नवे आयुष्य मिळाले आहे, असे महेश सांगतात.