सोलापूर: एकीकडे दसऱ्याची (Dasara) धामधूम, तर दुसरीकडे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं (Dhammachakra Pravartan Din 2023) औचित्य साधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे. "मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे (Praniti Shinde Lok Sabha) याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, मला जे करता येईल ती मदत मी करणार" असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. 


धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. त्यांनी सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकला भेट दिली. "दरवर्षी आम्ही जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतं असतो. मात्र योगायोगाने मी आज सोलापुरात आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आहे" असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. 


बाबासाहेबांच्या नावाशिवाय राजकारण अशक्य


बाबासाहेबांनी जी घटना आम्हाला दिली, त्या घटनेचा इतका जयजयकार झाला की त्या घटनेनुसारच आज देश चालतो आहे. बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आता कुठल्या पक्षाला राजकारणदेखील करता येत नाही हे आता सिद्ध झालं आहे.


दरम्यान यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीविषयीदेखील भाष्य केलं. मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे प्रणिती शिंदे ह्याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, मला जे करता येईल ती मदत मी करणार, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.  


सोलापूर लोकसभेसाठी शरद पवारांची रणनीती


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापूर दौऱ्याचं नियोजन केलं होतं. सोमवारी 23 ऑक्टोबरला हा दौरा नियोजित होता. मात्र तो पुढे ढकलण्यात आला. यावेळी पवारांसोबत सुशीलकुमार शिंदेंही उपस्थित राहणार होते. मात्र शरद पवार यांचा दौरा पुढे ढकलल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेदेखील कार्यक्रमाला गेले नाहीत.


सोलापूर लोकसभा मतदारसंघ (Solapur Lok Sabha Election)


सोलापूर लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य  यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. सुशीलकुमार शिंदे यांनी त्यावेळी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे निवडणुकीपूर्वी घोषित केलं होतं. मात्र त्या निवडणुकीत वंचितकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे मैदानात असल्याने, सुशीलकुमार शिंदेंना विजय मिळवता आला नव्हता. 


संबंधित बातम्या 


Sharad Pawar: शरद पवारांचा आजचा सोलापूर, माढा दौरा अचानक रद्द, कारण अद्याप अस्पष्ट   


सोलापूर लोकसभा । सुशीलकुमार शिंदेंच्या राजकीय जीवनाचा शेवट अखेर पराभवानेच, भाजपच्या स्वामींचा करिष्मा