Harshwardhan Patil and Supriya Sule : बारामती लोकसभेची (Baramati Loksabha) निवडणूक यंदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. त्यातच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) एका विवाह प्रसंगी एकत्र आले होते. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील एका लग्नाला दोघांनीही हजेरी लावली होती. हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे या विवाह सोहळ्यात शेजारी-शेजारी बसले होते. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे बारामतीची राजकीय गणितं बदलणार का? असा प्रश्न सध्या विचारल जातोय. 


अंकिता पाटलांनी लगावला होता अजित पवारांना टोला 


खर तर लोकसभा निवडणुक तोंडावर आहे. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आमच्या पाठीत 3 वेळा खंजीर खुपसला असा टोला अजित पवार यांना लगावला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. "आता आम्ही महायुतीत आहोत, पण महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवार यांनी तीन वेळेस शब्द दिला होता. मात्र, त्यांनी तो नंतर फिरवला", आमची फसवणूक केली, असं अंकिता पाटलांनी म्हटलं होतं. शिवाय तुम्ही आमचं विधानसभेला काम केलं तरच आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू, असा इशाराच अंकिता पाटलांनी दिला होता. 


2019 मध्ये अजित पवारांमुळे हर्षवर्धन पाटलांचा पराभव 


2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी अजित पवारांच्या विरोधामुळेचं पाटील यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्याची वेळी आली होती. काँग्रेसवर नाही तर अजित पवारांवर आरोप करत हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. शिवाय, भरणेही सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना छुपा पाठींबा देणार की, युतीधर्म पाळून अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


राजवर्धन पाटील यांच्याकडून विधानसभा लढवण्याचे संकेत


अजित पवार यांनी भाजपसोबत युती केल्यानंतर इंदापूरची जागा कोणाला मिळणार याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवणारचं अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात हर्षवर्धन पाटील अजित पवारांना मदत करणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी पूर्ण तयारी केली असून त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार याच उभ्या असतील हे जवळपास निश्चित झालं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


NCP Crisis: मोठी बातमी: अजितदादांचा शरद पवार गटावर सर्जिकल स्ट्राईक? बँक खातं, पक्ष मुख्यालय ताब्यात घेणार?