Siddheshwar Maharaj Yatra, Solapur: सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जवळपास 900 वर्षांची परंपरा आहे. यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka), आंध्र इत्यादी राज्यातून देखील भाविक घेत असतात. यात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात. मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे हा अभूतपूर्व सोहळा अनेक भाविकांना याची देही याची डोळा पाहता आला नाही. कोरोनाचे सावट कमी झाल्याने आणि राज्य शासनाने निर्बंध कमी केल्याने यंदा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यात्रेतील धार्मिक विधींना उद्यापासून सुरुवात होणार असून मुख्य धार्मिक विधी एक दिवस उशिरा होणार आहेत, अशी माहिती यात्रेची प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली.
दरवर्षी प्रथेप्रमाणे मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा पार पडत असतो. दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत असते. त्यामुळे 13 जानेवारीला सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा पार पडत असतो. यंदाच्या वर्षी अधिक महिना आल्यानं मकर संक्रांत ही एक दिवस उशिरा अर्थात 15 जानेवारी रोजी साजरी होणार आहे. त्यामुळे सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा हा 13 जानेवारी ऐवजी 14 जानेवारी रोजी साजरा होणार आहे. त्यापूर्वी यात्रेतील आणखी एक प्रमुख विधी असलेला यन्नीमज्जन सोहळा 13 जानेवारी रोजी पार पडणार आहे. यात्रेतील धार्मिक विधी मात्र उद्या 11 जानेवारी पासून सुरु होणार आहेत.
सिध्दरामेश्वर यात्रेचे धार्मिक विधी
11 जानेवारी : धार्मिक विधिनी यात्रेची सुरुवात
900 वर्षांपासून ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेच्या धार्मिक कार्यास रुढी परंपरेप्रमाणे 11 जानेवारी पासून सुरुवात होते. सिध्दरामेश्वरांच्या हातातील योगदंड उत्तर कसबा येथील कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून मठपती (स्वामी) हा योगदंड शुक्रवार पेठ येथील कै. रामचंद्रप्पा शेठे यांच्या वाड्यात घेऊन जातात. त्याठिकाणी मानकरी हिरेहब्बू आल्यानंतर त्या योगदंडाची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर होमहवन आणि अॅड. मिलिंद थोबडे हे पादपूजा करतात. त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम होतो. तेव्हापासून यात्रेच्या धार्मिक विधींना सुरुवात होते.
12 जानेवारी : नंदिध्वजास साज चढवणे
रात्री 12.5 मिनिटांनी कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजास साज चढविण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होते.
13 जानेवारी : यन्नीमज्जन
सकाळी 8 वाजता कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होते. पुजा झाल्यानंतर यात्रेस प्रारंभ होतो. त्यानंतर श्री सिध्देश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ 1 ते 7 काठ्या येऊन उभारल्यानंतर सरकारतर्फे देशमुख हे हिरेहब्बू यांना सरकारी आहेर करतात. हा मान ब्रिटीश काळापासून आजतागायत चालू आहे.
तिथून हे नंदीध्वज सिध्देश्वर मंदिरात 68 लिंगापैकी पहिले लिंग अमृत लिंगाजवळ येऊन थांबतात. त्याठिकाणी सातही नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू आणि शेटे तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधीवत पूजा करतात. पूजा झाल्यानंतर त्याठिकाणी शेटे यांना हिरेहब्बू हे विडा देतात. त्यानंतर देशमुख, मसरे, कळके, बहिरोपाटील, भोगडे, थोबडे, सिध्दय्या स्वामी, मल्लिनाथ जोडभावी, दर्गोपाटील, शिवशेट्टी, गवसणे, इटाणे (पूजेचे मानकरी, झोळीवाले मानकरी) यांना विडा दिला जातो. हा सर्व विड्यांचा मान हिरेहब्बू देतात. त्यानंतर 68 लिंगास यन्नीमज्जन (तैलाभिषेकांस) प्रारंभ होतो. पुढे गर्भ मंदिरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांचा गदगीस तैलाभिषेक घालून विधीवत पूजा हिरेहब्बू करतात. पुढे हे नंदीध्वज सोलापुरातील सर्व 68 लिंगास प्रदक्षिणा घालून रात्री हिरेहब्बूंच्या वाड्यात परत येतात.
14 जानेवारी : अक्षता सोहळा
सकाळी 7 वाजता कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन मिरवणुकीने सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळ्यासाठी संमती कट्याजवळ येतात. येथे सातही नंदीध्वज आल्यानंतर श्री शिवसिध्दरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीने सुगडी पुजा हिरेहब्बू आणि देशमुख करतात. त्यानंतर मानकरी कुंभार यांना हिरेहब्बू यांच्या हस्ते विडा दिला जातो. त्यानंतर श्री तम्मा शेटे संमती मंगल अष्टक हे हिरेहब्बू यांच्या स्वाधीन करतात. त्यानंतर हिरेहब्बू आणि देशमुख त्या संमतीची विधिवत पुजा करतात. हिरेहब्बू हे शेटे यांना विड्याचा मान देतात. त्यानंतर हिरेहब्बू संमती मंगल अष्टक तम्मा शेटे यांच्या स्वाधीन करतात ही रूढी परंपरा चालत आलेली आहे. त्यानंतर हिरेहब्बू देशमुख आणि तम्मा शेटे संमती कट्टयावर येतात. त्याठिकाणी श्री तम्मा शेटे संमती वाचन करतात. अशाप्रकारे अक्षता सोहळ्याच्या कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर सातही नंदीध्वज अमृतलिंगाजवळ येतात.
त्याठिकाणी हिरेहब्बू व शेटे यांच्या हस्ते अमृत लिंगाची पंचामृत अभिषेक करून विधिवत पुजा होते. त्यानंतर शेटे यांना हिरेहब्बू हे विडा देतात आणि इतर मानकऱ्यांना विड्याचा मान दिला जातो. त्यानंतर सिध्दरामेश्वरांच्या गदगीस अभिषेक करून हिरेहब्बू हे विधिवत पुजा करतात. तेथील विड्याचा मान तम्मा शेटे यांना दिला जातो. पुन्हा नंदीध्वज 68 लिंगास प्रदक्षिणा घालून परत रात्री हिरेहब्बू यांच्या वाड्यात परत येतात.
15 जानेवारी : होम प्रदिपन सोहळा
सकाळी 9 वाजता हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पुजा होऊन मिरवणूकीने संमती कट्टयाजवळ येऊन थांबतात. तेथे आल्यानंतर प्रथम श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या योगदंडास करमुटगी लावून त्या योगदंडास स्नान घालतात. नंतर पालखीतील मुर्तीस करमुटगी लावून स्नान घालतात. त्यानंतर 1 ते 7 नंदीध्वजांना करमुटगी लावून तलावात स्नान घालतात. त्यांनतर अमृत लिंगाजवळ हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते गंगा पुजनाचा धार्मिक विधी होतो. त्यानंतर देशमुखांना हिरेहब्बू हे विडा देतात. त्यानंतर गर्भ मंदिरातील श्री सिध्दरामेश्वरांच्या पादुकास करमुटगी लावून ते पादुका धुवून त्यानंतर हिरेहब्बू हे गदगीची (मुर्तीची) आरती करतात. नंतर नंदीध्वज दुपारी 1 वाजता परत हिरेहब्बू वाड्यात येतात.
संध्याकाळी 5 वाजता हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पुजा होऊन मिरवणूकीने जूनी फौजदार चावडी जवळ येऊन थांबतात. त्याठिकाणी पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधतात. 2 ते 7 नंदीध्वजांस बाशिंग बांधतात. पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधल्यानंतर हिरेहब्बूच्या हस्ते पुजा होते. पुजा झाल्यानंतर फडी नंदीध्वज पकडणारे आणि पहिली नंदीध्वज उचलून देणारे मास्तर यांना मानाचा हार घालण्यात येतो. सध्या नागफणी नंदीध्वजाचे मानकरी सोमनाथ मेंगणे यांच्याकडे असून ते सकाळ पासून उपवास करून तो नंदीध्वज एकटयाने होम मैदानापर्यंत आणतात. हौम मैदानावर नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू होमकुंडात उतरतात. त्या होमकुंडात बाजरीचा पेंडीद्वारे तयार केलेल्या कुंभार कन्येस शालू नेसवून सौभाग्य अलंकार घालून त्या मणी, मंगळसूत्र, बांगडया, जोडवे, हार दंडा घालून त्या कुंभार कन्येस सजवतात. त्यानंतर त्याची विधीवत पुजा करतात. त्यानंतर त्या कुंभार कन्येस हिरेहब्बू अग्नी देतात. त्यानंतर तेथील विड्याचा मान कुंभार यांना दिला जातो. त्यानंतर हिरेहब्बू, पालखी आणि नंदीध्वज होमास पाच प्रदक्षिणा घालतात. त्यांनतर तिळगुळाचा कार्यक्रम होऊन नंदीध्वज भगिनी समाजाजवळ येऊन थांबतात. नंदीध्वज आल्यानंतर त्याठिकाणी देशमुखांचा वासरू आणतात. त्या वासरांस दिवसभर उपवास ठेवला जातो. ते वास हिरेहब्बूच्याकडे स्वाधीन करतात. त्यानंतर पार्क मैदानावरील लिंगास पूजा करून आल्यानंतर हिरेहब्बू व देशमुख वासराची पुजा करतात. त्यानंतर वासरासमोर सर्व प्रकारचे धान्य आणि सर्व प्रकारचे विडा सामान ठेवले जाते. हिरेहब्बूंच्या हस्ते भाकणूक सांगतात. त्यावर्षीचे भविष्य श्री. राजशेखर हिरेहब्बू हे सांगतात. त्यानंतर नंदीध्वज मंदिरात येऊन परत मिरवणूकीने रात्री 12 वाजता नंदीध्वज हिरेहब्बूंच्या वाड्यात येतात. त्यानंतर तेथे फाडीचे मानकरी आणि हिरेहब्बू प्रसाद घेतल्यानंतर सर्व नंदीध्वजधारक, मानकरी यांना येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.
16 जानेवारी : शोभेचे दारूकाम कार्यक्रम
संध्याकाळी 5 वाजता हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पुजा होऊन मिरवणुकीने नंदीध्वज होम मैदानावर येतात. तिथे शोभेचे दारूकाम झाल्यानंतर नंदीध्वज परत मंदिरात येतात. मंदिरात आल्यानंतर हिरेहब्बू आणि पालखी श्री सिध्देश्वरांच्या गर्भ मंदिरास पाच प्रदक्षिणा घालतात. यानंतर 1 ते 5 नंदीध्वज पाच प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर 6 आणि 7 वी नंदीध्वज पाच प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी हिरेहब्बूच्या वाड्यात नंदीध्वज पुन्हा परत येतात. त्यानंतर मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वज धारक आणि मानकऱ्यांना प्रसाद दिला जातो.
17 जानेवारी : कप्पडकळी
ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेची सांगता कप्पडकळी विधिने होते. उत्तर कसबा येथील कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून श्री मठपती स्वामी हे श्री सिध्दरामेशरांच्या हातातील योगदंड शुक्रवार पेठेतील देशमुख यांच्या वाड्यात घेऊन जातात. हिरेहब्बू आल्यानंतर त्याठिकाणी श्री देशमुख हे श्री सिध्दरामेश्वरांच्या हातातील योगदंडाची विधिवत पूजा करतात. त्यानंतर होम हवन होऊन हिरेहब्बू यांचे पादपुजा करतात. त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर हिरेहब्बू यांना देशमुख यांच्या हस्ते रुमाल, शाल, श्रीफळ हार घालून आहेर करण्यात येतो. त्यानंतर देशमुखांना हिरेहब्बू हे खोबरे खारीक लिंबू याचे आशिर्वाद देतात. यात्रेचे चार दिवस कार्यक्रम सोहळ्यात हिरेहब्बू यांनी भगवे वस्त्र परिधान केलेला असतो, ते भगवे वस्त्र देशमुखांच्या वाड्यातून आल्यानंतर भगवे अंगरखावस्त्र उतरवतात. रात्री 10 वाजता हिरेहब्बू वाडयातून पहिली आणि दुसरी नंदीध्वज हिरेहब्बुच्या हस्ते पुजा झाल्यानंतर मल्लिकार्जुन मंदिरात येतात. तेथे आल्यानंतर पाचही नंदीध्वज श्री मल्लिकार्जुन गर्भ मंदिरास पाच प्रदक्षिणा घालतात. पाचही नंदीध्वजाची हिरेहब्बूंच्या हस्ते पुजा झाल्यावर कप्पकळीचा कार्यक्रम होतो. सर्व भाविकांना त्याठिकाणी हिरेहब्बूच्या हस्ते खारीकाचा प्रसाद देऊन पाच दिवसांच्या यात्रेचा कार्यक्रमाची सांगता केली जाते.