Solapur News : सोलापूर : राज्यभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे राज्यातील विद्यापीठातील परीक्षा पद्धतीवर मोठा परिणाम होतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजवर बहिष्कार आंदोलन सुरू केल्याने पुढील आदेशापर्यंत परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी ही माहिती दिली आहे. 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात  BA, BSC, BBA, LAW काही विभागाच्या सुरु आहेत किंवा काही विभागाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजवर बहिष्कार आंदोलन सुरु केल्याने परीक्षावर परिणाम झाला आहे. 2016 पासून शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. मात्र शासनाकडून केवळ आश्वासनाशिवाय काहीही मिळत नाही. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेतो. राज्यातील 288 पैकी जवळपास 200 आमदारांना यासंदर्भात पत्र दिले आहे. सर्व खासदाराने देखील या संदर्भात कळवलेले आहे. उच्च शिक्षण मंत्र्यांकडे देखील निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र या मागण्यांची दखल न घेतल्याने आजपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत. 20 फेब्रुवारीपासून परीक्षेसह सर्वच पद्धतीच्या कामकाज बंद करण्याचा इशारा महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला.


दरम्यान, 23 जानेवारीपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर काही विभागाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. अशातच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्याने परीक्षा स्थगित करण्याची नामुष्की ओढावली आहे.


कोविडमध्ये ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ऑफलाइन पद्धतीने  डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर आधीच दडपण होते. परीक्षा केंद्रावर ती आल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे सांगितल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ होत आहे. अनेक विद्यार्थी परगावहून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसानीसह मानसिक देखील नुकसान होत आहे. राज्य शासनाने  विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये अशा पद्धतीची भूमिका घ्यावी.  अशी प्रतिक्रिया विध्यार्थ्यांनी दिली.


शिवाजी विद्यापीठातील  आजच्या सर्व परीक्षा स्थगित


शिवाजी विद्यापीठातील  आजच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहे.  शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलनाचा परिणाम झाला आहे. विविध मागण्यांसाठी आजपासून कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.  परीक्षेची पुढील तारीख आणि माहिती संकेस्थळावर कळवली जाईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे


शिक्षेकतर कर्मचारी यांच्याशी या आहेत मागण्या :



  • सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करा

  • सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10.20.30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा.

  • सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या 1410 विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करुन विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करा.

  • विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या.

  • 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा

  • विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करा.