Solapur News : उत्तर सोलापूर (North Solapur) तालुक्यातील मार्डी येथे धक्कादायक घटना घडली आहे. खाजगी अनुदानित शाळेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने शेततळ्यात उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलांसह शेततळ्यात उडी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुलांनी उडी मारण्याआधीच कुटुंबियांनी त्यांना रोखलं तर मृत शिपायाची पत्नी मात्र गंभीर असून सध्या सोलापुरातील खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. हणमंत विठ्ठल काळे असे आत्महत्या केलेल्या 36 वर्षीय शिपायाचे नावे आहे.


शालार्थ आयडी मंजूर न झाल्याने पगार झालाच नाही. हे शालार्थ आयडी बनवण्यासाठी पुण्यातल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती. पगार नसल्याच्या तणावातून हणमंत काळे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांचे वडील विठ्ठल काळे यांनी केला आहे. 


'शालार्थ आयडीसाठी अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी, तणावातून मुलाने जीव दिला' 


जवळपास 13 वर्षांपूर्वी हणमंत काळे हे सोलापुरातील खासगी अनुदानित शाळेत शिपाई म्हणून भरती झाले. सुरुवातीला त्यांच्या नियुक्ती संदर्भात न्यायालयामध्ये प्रकरण सुरु होते. मात्र न्यायालयाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले. त्यानंतर 2016-17 साली पगार सुरु करण्यासाठी शालार्थ आयडी बंधनकारक असल्याचा नियम करण्यात आला. तेव्हापासून हणमंत काळे यांचा प्रस्ताव शिक्षण विभागातील उपसंचालक कार्यालयात प्रलंबित होता. मात्र शालार्थ आयडीसाठी मंजूर करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यानेच शालार्थ आयडी दिला नाही. त्याच तणावातून मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा मृताचे वडील विठ्ठल काळे यांनी आरोप केला आहे. "पैशाची मागणी कोणी केली त्या अधिकाऱ्याचे नाव मुलाने सांगितलं नाही, पण तो कायम याच तणावात होता" अशी माहिती देखील त्यांनी यावेळी एबीपी माझाशी बोलताना दिली.


अधिकाऱ्यांनी माझ्या मुलाचा जीव घेतला, मृताच्या वडिलांचा आरोप


"मी गडचिरोलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवा केली. तब्बल पाच वर्ष सेवा करुन मी आठ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालो. तेव्हापासून कुटुंबाचा उदरनिर्वाह मीच करत आलोय. माझा पगार कधी होईल याच तणावात मुलगा कायम होता. आज आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी कुटुंबातील माझ्या मुलाचा जीव या अधिकाऱ्यांनी घेतला. जोपर्यंत शासन न्याय देत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयातून नेणार नाही," अशी प्रतिक्रिया मृताचे वडील विठ्ठल काळे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.


हेही वाचा


Solapur Crime : सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ, शतपावलीसाठी गेलेल्या एपीआयची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या