Solapur News : सोलापुरातील (Solapur) सांगोला तालुक्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाची (Assistant Police Inspector) निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सूरज चंदनशिवे असं या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. जेवण झाल्यावर काल (2 ऑगस्ट) रात्री बाराच्या सुमारास शेताबाहेर रस्त्यावर शतपावलीसाठी गेले असताना दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने त्यांची हत्या (Murder) केली.
दोन महिन्यांपूर्वी पोलीस दलातून बडतर्फ
सांगोला (Sangola) तालुक्यातील वासूद इथे ही धक्कादायक घटना घडली. सूरज विष्णू चंदनशिवे हा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. 2018 साली झालेल्या वारणानगर इथल्या नऊ कोटी रुपये चोरी प्रकरणातील संशयित आरोपी सूरज चंदनशिवेवर गुन्हा दाखल होऊन त्याचे निलंबनही झाले होते. वर्षभरापूर्वी निलंबन मागे घेऊन सध्या सांगली (Sangli )पोलीस मुख्यालयात कंट्रोल विभागात कार्यरत होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी सूरज चंदनशिवेला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं.
शतपावली करायला घराबाहेर, पण...
सूरज चंदनशिवे सध्या गावाकडे शेतात राहायला आला होता. रोज जेवण झाल्यावर रात्री उशिरा त्याला शतपावली करायची सवय होती. त्याचपद्धतीने काल रात्री तो जेवण झाल्यावर वासूद केदारवाडी रोडवर शतपावली करत होता. मात्र त्याच वेळी दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी त्याची निर्घृण हत्या केली. रात्री तो परत घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध सुरु केला असता पहाटे फिरायला आलेल्या काही जणांना सूरज चंदनशिवे यांचा मृतदेह शेतात दिसला. यानंतर सांगोला पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांची टीम घटनास्थळी पोहोचल्यावर चंदनशिवे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.
पोलीस अधिकाऱ्याच्या निर्घृण हत्येमुळे खळबळ
सूरज चंदनशिवेने सांगली जिल्ह्यात काम केलं असून तिथे काही वादग्रस्त प्रकरणात त्याचं नाव आल्याने त्यांना काहीकाळ निलंबित केलं होतं. सध्या त्यांना पोलीस सेवेतून बरखास्त करण्यात आलं होतं. आता पोलीस त्यांच्या हत्येचा तपास करत आहेत. सूरज चंदनशिवे यांच्या हत्येमागे पोलीस खात्यात काम केल्याने गुन्हेगारांकडून असलेले वैर, स्थानिक वाद या सर्व बाबींचा पोलीस कसून तपास करत आहेत. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याची अशा रितीने झालेल्या निर्घृण हत्येमुळे सांगोला परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
सांगोलामध्ये वावटळीत झोळी उडाल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, लेंडी ओढ्यातील दुर्दैवी घटना