Solapur News : महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, महसूल कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी (Maharashtra Government Staff Strike) यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भामध्ये आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्हाधिकारी साहेब तुम्ही आदेश द्या अन्यथा तुमच्या कार्यालयात वर्ग घ्या, असं हा विद्यार्थी बोलत आहे. तसंच आमच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण, असा सवालही त्याने विचारला आहे.
दरम्यान, राज्यभरातील वेगवेगळ्या विभागातील शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी संपावर गेले असून, आज (20 मार्च) या संपाचा सातवा दिवस आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी संपकरी कर्मचाऱ्यांनी कामबंदची हाक दिली आहे. मध्यवर्ती संघटना आणि इतर घटक संघटनांनी शासनासोबत चर्चा केली. त्यामध्ये तोडगा न निघाल्याने आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. परंतु या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
दोन दिवसात वर्ग सुरु करा अन्यथा...
याबाबत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या तन्मय भोसने नावाच्या विद्यार्थ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. तन्मय भोसले हा सोलापुरातील मोहोळ इथल्या जिल्हा परिषदेच्या चंद्रमौळी प्राथमिक शाळेत शिकत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने जिल्हाधिकारी, सरकार, संपकऱ्यांना उद्देशून काही प्रश्न विचारले आहेत. या व्हिडीओमध्ये तन्मय भोसले म्हणलो की, "कोरोना महामारीमध्ये आमचे नुकसान झाले आहे. तुमच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही परंतु या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी या दोन दिवसांमध्ये वर्ग सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी साहेब तुम्ही द्या, अन्यथा तुमच्या कार्यालयामध्ये वर्ग घ्या. जर तुम्ही कार्यालयामध्ये वर्ग न घेतल्यास आम्ही तुमच्यासमोर दप्तरासह अभ्यासाला बसू. तुम्ही आम्हाला शिकवावं, न शिकवल्यास आम्ही बोंबाबोंब करणार आहोत. आमच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण?
संपामुळे रुग्णालये व्हेंटिलेटरवर, प्रशासकीय काम खोळंबले, शेतीचे पंचनामे रखडले
सरकारी कर्माचाऱ्यांचा संप सुरु होऊन सात दिवस झाले तरी सरकारने अद्याप संपाची दखल घेतलेली नाही. या संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी प्रशासकीय कामं खोळंबली आहेत. तर कुठे रुग्णांचे हाल होत आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु संपामुळे शेतीचे पंचनामा रखले आहेत. त्यामुळे सरकार या संपावर कधी तोडगा काढणार याकडे लक्ष लागलंय. यावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत.
राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने राज्यव्यापी संप आंदोलन सुरू केले आहे. आज या संपाचा सातवा दिवस आहे या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांकडून संप काळात विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत
20 मार्च : थाळी नाद
सर्व जिल्हा कर्मचारी कार्यालयासमोर, शाळेसमोर दुपारी 12 ते साडे 12 या वेळात गगनभेदी थाळी नाद करुन राज्य सरकारच्या नकारात्मक भूमिकेचा धिक्कार करणार आहेत
23 मार्च : काळा दिवस
या दिवशी जिल्हानिहाय कर्मचारी शिक्षक काळे झेंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत. घोषणांच्या निनादात निदर्शने करण्यात येणार आहे.
24 मार्च : माझे कुटुंब माझी पेन्शन अभियान
या दिवशी जिल्हा न्याय कर्मचारी शिक्षक कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निषेध व्यक्त करणार आहेत.