Solapur News: लग्न म्हटलं की हल्ली बऱ्याच हौसमौज केल्या जातात. लग्नाचे अनेक विधी देखील मोठ्या थाटामाटात हल्ली पार पाडले जातात. प्री-वेडींग, मग पोस्ट वेडींग असे अनेक प्रकार लग्नाच्या वेळेस तरुण-तरुणी आवडीने करतात. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात आणि खूप हौसेने केली जाणारी गोष्ट म्हणजे प्री-वेडींग शूट. पण सध्या या प्री-वेडींग (Pre-Wedding) शूटवर नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. लग्नापूर्वी केले जाणारे प्री वेडींग शूट बंद करण्यात यावेत असे आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे. सोलापुरात मराठा सेवा संघाच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांनी प्री वेडींग शूट बाबत नाराजी व्यक्त केली. 'कोणीही लग्नाआधी प्री वेडींग शूट करू नये' असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
हल्लीच्या काळात प्री वेडींग शूट ही गोष्ट अगदी सामान्य होत चाललेली गोष्ट आहे. परंतु या प्री-वेडींग शूटसाठी लाखो रुपये खर्च केले जातात असं लोकांचं म्हणणं आहे. अशावेळी जर कोणत्या पालकांची परिस्थिती नसेल तर त्यांना आपल्या मुलांची हौस पूर्ण करण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ येते. तसेच हे खासगी फोटो सोशल मीडियावर सार्वजनिक केले जातात.त्यामुळे या फोटोंचा गैरवापर होण्याची देखील शक्यता असते. या शूटमुळे कोणताही चांगला संदेश समाजात जात नाही असं देखील मत 'एबीपी मझा'शी बोलताना काही लोकांनी व्यक्त केलं आहे.
यावर तरुणाईचं मत काय?
अनेक तरुण या गोष्टीकडे रोजगाराची एक उत्तम संधी म्हणून पाहतात. त्यामुळे बरेच तरुण हल्ली या गोष्टीकडे करिअरची संधी म्हणून देखील पाहत असल्याचं चित्र हल्ली पाहायला मिळत आहे. अनेक तरुण फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर केवळ प्री वेडींग फोटोशूटसाठी ओळखले जातात. त्यामुळे प्री-वेडींग शूटमध्ये काहीही चुकीचं नसल्याचं तरुणांच मत आहे.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यतील अविस्मरणीय क्षण असतो. त्यामुळे या क्षणाच्या आठवणींना सुंदर करण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. प्री वेडींग देखील त्याचाच एक भाग आहे.पण हे करताना खर्चाचा देखील तरुणांनी विचार करावा असं देखील म्हटलं जात आहे. तसेच अशा वेळेस कोणत्याही प्रकारची मर्यादा तरुणांनी ओलांडू नये असं आवाहन देखील तरुणांसाठी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Jalgaon : वारेमाप खर्चाला फाटा, लेकीचं लग्न, शेतकऱ्याने वऱ्हाडींना वाटली वडाची झाडं अन् बियाणे