Jalgaon News : लग्न म्हटलं की वर-वधू पक्षाकडून नेहमीच काहीतरी हटके करण्याचा मानस असतो. त्यामुळे आपला विवाह सोहळा लोकांच्या स्मरणात राहावा, यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा यायचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाल्याचे दिसून आले आहे. जळगावमधील (Jalgaon) एका बियाणे विक्रेत्याने आपल्या लेकीचा लग्नात उपस्थितांना वडाचं रोपटं आणि शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करत अनोखा आदर्श घालून दिला आहे.
आजकाल लग्नात वारेमाप खर्च करुन लग्न वेगळं कसं हे दाखवले जाते. कुणी लग्नात हेलिकॉप्टरने एंट्री करतं तर कुणी बुलेटवर लग्न मंडपात आल्याचे अनेकदा पाहिलं. मात्र काही असेही लग्न सोहळे (Wedding) पार पडले, ज्यात इतर आई-वडिलांना आदर्शवत असे लग्न पार पडल्याचे दिसून आले. जळगावातील एका बियाणे विक्रेत्याने आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात शेतकऱ्यांना चक्क वडाचं रोपट अन् बियाण्याचं वाटप करत शेतकऱ्यांची प्रतीची बांधिलकी जोपसली आहे. वधू आणि वर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वडाचं रोपटं देण्यात आलं आहे. याच उपक्रमामुळे अनोखा ठरलेला हा विवाह सोहळा जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
जळगावातील प्रसिद्ध बियाणे विक्रेते विनोद तराळ यांची कन्या ऐश्वर्या हीचा रोशन देवकर यांच्यासोबत आज मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील अंतूर्ली इथे पार विवाह सोहळा पडला. लाडक्या लेकीचा विवाह सोहळा थाटात व्हावा, असं प्रत्येक पित्याची अन् स्वतः लेकीची सुद्धा इच्छा असते. मात्र या लग्नात जास्तीचा खर्च न करता पैसे वाचवून त्या बदल्यात शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रम विनोद तराळ यांनी राबवला आहे. मुबलक स्वरुपात पाऊस पडावा, म्हणून झाडांचं महत्त्व तर आहेच. पण त्याचबरोबर वडाच्या झाडाचे मोठे महत्व आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने शेतात वडाचं रोपट लावावं यासाठी चक्क लग्न मंडपात वधू आणि वराच्या हस्ते शेतकऱ्यांना वडाचं रोपट भेट म्हणून देण्यात आले. या रोपट्या बरोबरच तुरीच्या बियाण्यांचं सुद्धा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं.
शेतकरी दुहेरी संकटात...
एकीकडे अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला ही विनोद तराळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आनंदात सहभागी करुन घेतले. केवळ आनंदातच सहभागी करुन घेतले नाही तर शेतकऱ्याला कायम स्मरणात राहिल, अशी वडाचं रोपट्याची भेट देण्यात आली. लग्न सोहळ्यातील या उपक्रमामुळे शेतकरी चांगलेच भारावल्याचं पाहायला मिळालं. याचा मोठा आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांनी विनोद तराळ आणि त्यांच्या कुटुंबाचं कौतुक सुद्धा केलं.
लग्न सोहळ्याची जिल्ह्यात चर्चा
शेतकऱ्यांसाठी जो उपक्रम लग्न सोहळ्यात राबवण्यात आला त्यामुळे नक्कीच आमचा विवाह सोहळा हा अविस्मरणीय ठरला आहे. शेतकऱ्यांना आमच्या हाताने वडाचं रोपटं आणि बियाणे देण्यात आले. यासारखा दुसरा आनंद कुठला अशा भावना वराने व्यक्त केल्या आहेत. या अनोख्या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. तर वधू आणि वर यांच्यासाठी सुद्धा हा विवाह सोहळा अविस्मरणीय ठरला असल्याची प्रतिक्रिया वर रोशन देवकर याने दिली आहे.