सोलापूर: लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयान यासंबंधित आदेश देत किरण लोहार यांना 3 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार चर्चेत आले होते. 


स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या यु-डायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. सोमवारी ते स्वीकारताना लाच लुचपत विभागाने त्यांना रांगेहात ताब्यात घेतलं होतं.


कसे सापडले जाळ्यात? 


या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरचे उपाधीक्षक संजीव पाटील माहिती दिली. ते म्हणाले की, शिक्षण संस्था संचालक असलेल्या एका तक्रारदाराने या संदर्भात आमच्याकडे तक्रार केली होती. आपल्या शाळेतील वर्गवाढीचा प्रस्ताव तक्रारदाराने शिक्षण विभागाकडे पाठविला होता. यासाठी यु-डायस प्रणालीद्वारे वरिष्ठ कार्यालयाकडे हा प्रस्ताव पाठवण्यासाठी शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. लाचेची ही मागणी असल्याचे आमच्या पडताळणीमध्ये समोर आले होते. लाचेच्या या रकमेपैकी 25 हजार रुपये स्वीकारताना शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही रंगेहात ताब्यात घेतले आहे. यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी काही अपसंपदा जमा केली आहे का याची देखील चौकशी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.


रणजित डिसले गुरुजींनी केला होता आरोप 
  
शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल रणजित डिसले यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला होता. तसेच त्यांना अमेरिकेची फुलब्राईट शिष्यवृत्तीही जाहीर झाली होती. किरण लोहार आपल्याला मिळालेल्या पुरस्कारापैकी काही पैसे मागत असल्याचा आरोप रणजित डिसले यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. 


या मुलाखती नंतर भ्रष्ट शिक्षणाधिकारी किरण लोहार अधिकच बेताल झाले. त्यांच्या चुकीच्या भूमिकेला चांगली प्रतिमा असलेल्या जिल्हा परिषदेचेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी पण पाठिंबा दिला अशी शिक्षण विभागात चर्चा आहे. त्यामुळे रणजित डिसले यांच्या आरोपांची सरकारने वेगळी चौकशी करावी का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


झेडपी सीईओंचाही किरण लोहारांना पाठिंबा? 


शासकीय कामासाठी 25 हजारांची लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा छुपा पाठिंबा आहे का असा सवाल अनेक शिक्षकांनी उपस्थित केला. किरण लोहार यांच्या विरोधात वारंवार तक्रारी येऊनही सीईओंनी कोणतीही कारवाई केली नसल्याचं शिक्षकांनी निदर्शनास आणून दिलं. शनिवारी आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी किरण लोहार हे शासकीय गाडीचा वापर करुन कोल्हापूरला जायचे. या बाबत दिलीप स्वामी यांच्याकडे अनेकदा तक्रारी गेल्या होत्या. पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही किंवा कधीही समज दिली नाही अशी तक्रार आता शिक्षक करतायत.


आता प्रतिमा उंचावली का? 


डिसले गुरुजींनी एबीपी माझाशी बोलताना किरण लोहार यांनी आपल्याकडे लाच मागितल्याचा आरोप केला होता. तसेच शिष्यवृत्तीसाठीच्या रजेसाठी अडवणूक केल्याचाही आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी डिसले गुरुजींनाच नोटीस पाठवत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. तुम्ही केलेल्या आरोपांमुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असून तुम्ही पुरावे द्या अशा प्रकारची नोटीस डिसले गुरुजींना पाठवण्यात आली. 


आता शिक्षणाधिकारी किरण लोहार हे त्यांच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष लाच घेताना सापडले. मग यामुळे प्रशासनाची प्रतिमा उजळ झाली का? असा सवाल आता शिक्षकांकडून आणि सामान्य नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. 


किरण लोहार हे  सोलापूर आधी कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत होते. तिथेही त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली होती. काही राजकारणी मंडळींना हाताशी धरून किरण लोहार बेकायदेशीर काम करत होते असा त्यांच्यावर आरोप आहे. किरण लोहार यांची पीएचडी मुळात बोगस आहे असाही आरोप केला जातोय. काल प्रहार संघटनेला फक्त किरण लोहार असं नाही तर सर्व शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.