Kiran Lohar ACB Raid : सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran Lohar) 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. लोहार तसेच अन्य एका कर्मचाऱ्यालाही  ताब्यात घेतले. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी किरण लोहार चर्चेत आले होते.  


कोल्हापूरमधील सुद्धा किरण लोहार यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. किरण लोहार यांच्या कोल्हापूरमधील बंगल्यावर कोल्हापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने झाडाझडती केली आहे. विभागाने काल रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 3 पर्यंत कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी किरण लोहार यांच्या बंगल्यात रोख रक्कम आढळून आली नाही. दरम्यान, तपासणी केल्यानंतर किरण लोहारच्या स्थावर मालमत्तेचा अहवाल आज सोलापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे सुपूर्द केला जाणार आहे. 


कोल्हापूरमध्येही अत्यंत वादग्रस्त कारकिर्द 


किरण लोहार यांची 13 महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत बदली झाली होती. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत काम केलं आहे. तथापि, कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्यांची शैली अत्यंत वादग्रस्त ठरली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केला होता. त्यामुळे लोहार यांना कार्यमुक्त करण्याचा ठरावही कोल्हापूर जिल्हा परिषदेने केला.


सप्टेंबर 2018 मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक या दोन्हीपदावरुन कार्यमुक्त केले. नंतर लोहार यांनी या कारवाई विरोधात कायदेशीर लढा देत कारवाईला स्थगिती मिळवली होती.


पीएच.डी आणि विद्यापीठाची सुद्धा चांगलीच चर्चा


किरण लोहार जिल्हा परिषदेतील कामाच्या पद्धतीवरून जितके वादग्रस्त ठरले. त्याच पद्धतीने त्यांची पीएच.डी सुद्धा चांगलीच चर्चेत आली होती. त्यांनी एका खासगी विद्यापीठाने पीएच.डी दिल्यानंतर त्यांनी एकप्रकारे सूचनावजा फर्मान काढताना गावभर फलक लावण्यासाठी सांगितले होते. 


कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून ऑनररी पीएच. डी पदवी प्रदान करण्यात आली होती, पण ज्या संस्थेकडून ही पदवी देण्यात आली ती कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा ही संस्थाच मुळात बोगस असल्याचं शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झाले होते. टोंगा या देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतंही विद्यापीठ नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.


इतर महत्वाच्या बातम्या