Jaisiddeshwar Swami : माझ्यावर बोलायच्या आधी माहिती घ्या, संसदेतील उपस्थितीची आकडेवारी सांगत जयसिद्धेश्वर स्वामींचे सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर
Jaisiddeshwar Swami Reply To Supriya Sule : पक्षाने जर आपल्याला पुन्हा संधी दिल्यास सोलापुरातून निवडणूक लढवू असे संकेत भाजपचे खासदार जयसिद्धेश्वस स्वामी यांनी दिले आहेत.
सोलापूर: मी लोकसभेत 97 टक्के उपस्थिती लावली असून विविध विषयावर 127 वेळा बोलल्याची माहिती उत्तर सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी (Jaisiddeshwar Swami) यांनी दिली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जयसिद्धेश्वर स्वामींवर टीका केली होती. त्याला आज जयसिद्धेश्वर स्वामींनी प्रत्युत्तर दिलं. पक्षाने संधी दिल्यास सोलापुरातून (Solapur Lok Sabha Election) पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर टीका करताना ते दिल्लीत फक्त एक-दोनवेळा दिसले आणि संसदेत ते कधी बोलले नसल्याची टीका केली होती.
दोनच दिवसापूर्वी माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांनीही सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं. आपण काय काम केलं हे पाहायचे असेल तर आपल्याविरोधात माढा लोकसभा निवडणूक (Madha loksabha) लढा असं थेट आव्हान त्यांनी सुप्रिया सुळे यांना दिलं होतं. आता सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनीही सुप्रिया सुळे याना उत्तर देताना आधी माहिती घ्यावी असा टोलाही लगावला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 19 व्या युवा महोत्सवाचा शुभारंभ खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज येथे करण्यात आला. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे , रिपाईचे राज्यसचिव राजाभाऊ सरवदे आणि स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बब्रुवान रोंगे उपस्थित होते.
उदघाटन संभारंभानंतर खा. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिले. येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून पुन्हा आपल्या नावाची चर्चा सुरु असून पक्षाने पुन्हा संधी दिल्यास लढण्यास तयार असल्याचे संकेतही खासदार स्वामी यांनी दिले. वास्तविक खा. स्वामी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत न्यायालयीन लढाई सुरु असूनही त्यांनी दिलेले संकेत विशेष आहेत.
रणजितसिंह निबांळकर यांचे प्रत्युत्तर
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे माढाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर निंबाळकरांनी दिलं. मला मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. माझ्या आधीच्या काळात शरद पवार हे देखील माढा मतदारसंघाचे खासदार होते. ते किती वेळा मतदारसंघात आले हे सुप्रिया सुळेंनी सांगावे असे खासदार निबांळकर म्हणाले. लोकसभेत मी बोललो आहे, लोकांचे प्रश्न मांडले आहेत, मी बोलण्यापेक्षा काम केले आहे. सुप्रिया सुळेंच्या वडिलांपेक्षा जास्त माढा मतदारसंघात मी काम केल्याचा दावा खासदार निंबाळकर यांनी केला.
ही बातमी वाचा: