सोलापूर : सांगोला तालुक्यातील वासुद येथे रात्री जेवण झाल्यावर फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे यांच्या हत्येचा गुंता सुटला आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी सिंही मधुकर केदार याला पोलिसांनी अटक केली आहे. सुनील केदार हा देखील वासुद याच गावाचा असून चंदनशिवे हत्ये प्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील केदार आणि त्याचा गावातील सहकारी विजय केदार या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पूर्वीच्या पैशाच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचे  समोर येत आहे.  हत्या झालेले सुरज चंदनशिवे यांना केदार यांचे काही पैसे द्यायचे होते, यावरून वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. 


वारणा येथील एका गुन्ह्याच्या प्रकरणात हत्या झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे वादात सापडले होते. नंतरच्या काळात चंदनशिवे यांना पोलीस दलातून सक्तीने सेवानिवृत्त केल्याचीही माहिती मिळत आहे. चंदनशिवे आणि केदार यांच्यात पैशांचे मोठे व्यवहार होते. या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांना संशय असून या प्रकरणाचा तपास सांगोला डीवायएसपी विक्रांत गायकवाड करत आहेत. 


हत्या झालेले सुरज चंदनशिवे यांना जेवण झाले की रात्री शेतातून रस्त्यावर येऊन शतपावली करायची सवय होती. हत्येच्या रात्री म्हणजे 3 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुरज चंदनशिवे हे सांगोला वासुद रस्त्यावर शतपावली करत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली होती. जेवणानंतर बाहेर गेलेले सूरज परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा रात्री शोध सुरु केला होता. यावेळी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह रस्त्यावरून ओढत नेऊन उसाच्या शेतात टाकल्याचे दिसून आले होते. यानंतर सांगोला पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांची टीम घटनास्थळी पोचल्यावर चंदनशिवे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 


या घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून तातडीने तपासाच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केल्यावर त्यांना पंधरा दिवसानंतर याची उकल करण्यात यश आले आहे. हत्येचा गुन्हा दाखल असलेला आरोपी सुनील केदार हा देखील वासुद गावातील असून त्यांनी चंदनशिवे याना पैसे दिले होते. हे पैसे परत घेण्यावरून वाद झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आता या प्रकरणाचा तपास सांगोला डीवायएसपी संग्राम गायकवाड यांनी हाती घेतला आहे. आरोपी सुनील केदार आणि त्याचा सहकारी विजय केदार यांची चौकशी सुरु केली आहे .